कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी सात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह विरोधात गुन्हा दाखल!

पिंपरी : कंपनीने बक्षीस स्वरूपात दिलेल्या कार स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक असताना सात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) ने कार स्वतःच्या नावावर करून घेतल्या नाहीत. तसेच कंपनीतील नोकरी सोडून कंपनीचा विश्वासघात करत कार वापरल्या. याप्रकरणी सात एमआर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०११ ते मे २०२५ या कालावधीत वाकड येथे घडला.
तरणजित सिंग (चंदीगड), शिवसेन मुरुगसन (चेन्नई), प्रशांत कुमार शेट्टी (कर्नाटक), उपेंद्र सिंग (पणजी), जनमजय कुमार मंजय दिघी ), प्रीतम दास गुप्ता (दावणगिरी), जगन्नाथ दत्ता (कोलकाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जिनोवा कंपनीतील व्यवस्थापक महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमआर जिनोवा या औषध कंपनीत काम करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांना कंपनीने प्रत्येकी एक कार बक्षीस म्हणून दिली होती. त्या कार तीन वर्षात आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक होते. मात्र तीन वर्षात आरोपींनी कार स्वतःच्या नावावर करून घेतल्या नाहीत. दरम्यान आरोपींनी कंपनीतील नोकरी सोडली. त्यानंतर कंपनीने आरोपींना कार नावावर करून घेण्याबाबत नोटीस दिली. कंपनीच्या प्रतिनिधींनी आरोपींच्या घरी भेट दिली. हजर राहण्याची आणखी नोटीस दिली. मात्र आरोपींनी कंपनीशी कोणताही संपर्क न करता कंपनीचा विश्वासघात केला आहे.
कन्स्ट्रक्शन साईटवरील साहित्याची चोरी
पिंपरी : कन्स्ट्रक्शन साईटवर ठेवलेले सात हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य चार जणांनी टेम्पो मधून चोरून नेले. ही घटना बुधवारी (२८ मे) रात्री शिल्पकार कन्स्ट्रक्शन साईट, चऱ्होली बुद्रुक येथे घडली.
याप्रकरणी राकेशकुमार धीरज सत्येंद्र सिंग (वय ४०, चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता नागनाथ सारगे (वय ४५, येरवडा), तन्मय सुनील दळवी (वय २०, विश्रांतवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह एक महिला आणि १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी टेम्पो मधून कन्स्ट्रक्शन साईटवरील साहित्य चोरी केले. चोरी केलेले साहित्य घेऊन जात असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.