महिला पोलिसाचा विनयभंग भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल!

पुणे : भाजपचा पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . प्रमोद कोंढरे याच्यावर यापूर्वीही पुण्यातील डेक्कन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याबरोबरच खडक पोलीस स्टेशन आणि डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुण्यातील शनिवार वाडा जवळ एका कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन प्रमोद कोंढरे याने महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केला . या महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर प्रमोद कोंढरेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे . सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते .त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले , त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला .त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली.

पोलिसांकडून त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले. त्यामधून महिला पोलीस निरीक्षकाच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. त्या महिला पोलीस निरीक्षकाने याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली, त्यानंतर प्रमोद कोंढरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला . कोंढरे यांच्यावर यापूर्वी खडक पोलीस स्टेशन ,विश्रामबाग पोलीस स्टेशन ,डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.