सायबर टोळीला बँक खाते पुरवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा!

पिंपरी : संघटित सायबर गुन्हेगार टोळीला स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जानेवारी ते 30 जून 2026 या कालावधीत राहटणी येथील पर्ल पेलेडियम सोसायटी मधील दुकानात घडली.
याप्रकरणी भास्कर भारती पोलीस शिपाई काळेवाडी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रेम नंदू लोखंडे (वय 19, रा थेरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने स्वतःच्या नावाने सहकारी बँकेत खाते उघडून ते संघटित सायबर गुन्हेगार टोळीला वापरण्यासाठी दिले. या खात्यावर 23 लाख 23 हजार 341 रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले. या माध्यमातून देशातील दोन नागरिकांची दोन लाख 62 हजार 9 48 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुनावळे येथे 63 हजारांची डोडा अफू जप्त!
पिंपरी : पुनावळे परिसरात डोडा अफू (पीपी स्ट्रॉ) विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवार 15 जुलै रोजी दुपारी महादेव किराणा दुकाना समोरील रस्त्यावर करण्यात आली.
गोविंद डोके पोलीस शिपाई रावेत पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. राजाराम जगाराम चौधरी (वय 42, रा. पुनावळे) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 63 हजार रुपये किंमतीचा 200 ग्रॅम डोडा अफूचा चुरा विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगून होता. त्याच्याकडून अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. हा अमली पदार्थ सुमेर विश्नोई याने पुरवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रावेत पोलीस पुढील तपास करत आहे.

