महामार्गावर पाणी मागण्याच्या बहाण्याने कार चालकाला लुटले!

पिंपरी : पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने कारची काच खाली करण्यास सांगून तिघांनी चालकाला मारहाण केली. त्यानंतर दोन हजारांची रोकड आणि मोबाईल हिसकावून नेला. ही घटना बेंगळुरू- मुंबई महामार्गावर बाणेर येथे रविवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या सुमारास घडली.

स्वप्निल सुनील शिंदे (वय 22, रा. लवळे गाव, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजवीर, साहिल आणि विशाल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांनी कार रस्त्याच्या कडेला थांबवली होती. त्यावेळी आरोपी तेथे आले. साहिल याने पिण्याचे पाणी मागत कारची काच खाली करण्यास सांगितले. त्यानंतर दरवाजा उघडून कारची चावी काढून घेतली. तिघांनी शिंदे यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या पाकिटातील दोन हजार रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून आरोपी यांनी पोबारा केला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

लोखंडी सुरा बाळगणार्या चालकावर गुन्हा दाखल!
पिंपरी : रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या लोखंडी सुरा बाळगणाऱ्या चालकावर काळेवाडी पोलिसांनी कारवाई केली. रहाटणी येथे सोमवार 5 ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई भीमाशंकर भोसले यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सयाजी दत्ता सालकमवाड (वय 40, रा. रहाटणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी त्याच्या रिक्षामध्ये लोखंडी सुरा बेकायदेशीर रित्या बाळगला होता. पोलिसांनी झडती घेत त्याच्याकडून पाचशे रुपये किंमतीचा सुरा जप्त केला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

