ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून व्यवसायिकाची एक कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : टेलिग्राम व ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फायद्याचे अमिष दाखवून एका व्यवसायिकाची तब्बल एक कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत चिखली परिसरात घडली .

बेटेज ट्रेडिंग ग्रुपचा एरिया मॅनेजर असल्याचे सांगणारा आदित्य ठाकूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गोविंद विश्वनाथ मुळे (वय 40, रा. चिखली, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने टेलिग्राम द्वारे फिर्यादी गोविंद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर टेलिग्राम वर लिंक पाठवून ट्रेडिंग मध्ये मोठा नफा मिळेल असे सांगितले. त्यानंतर गोविंद यांच्याकडून वेगवेगळ्या यूपीआय पेमेंट द्वारे रक्कम उकळून त्यांना टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी करून घेतले. काही काळानंतर फिर्यादीचा ट्रेडिंग आयडी ब्लॉक करून एकूण एक कोटी 94 लाख 14 हजार पाच रुपये ऑनलाईन पद्धतीने लुबाडण्यात आले. चिखली पोलीस तपास करीत आहे.

