स्वराष्ट्र घडविणे स्वभाव झाला पाहिजे : प्रा. मैत्रेयी शिरोळकर

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने शिक्षकदिन साजरा
पिंपरी : ‘स्वराष्ट्र घडविणे हा आपला स्वभाव झाला पाहिजे; तरच प्रत्येक छोट्यामोठ्या कृतीतून राष्ट्र उभारणीचे कार्य आपल्या हातून घडेल असे विचार ज्येष्ठ समुपदेशिका प्रा. मैत्रेयी शिरोळकर यांनी महाराणा प्रताप गौशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक ०५ सप्टेंबर रोजी व्यक्त केले.

शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित कार्यक्रमात समिती संचलित विविध शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन करताना ‘स्वबोध आणि चिंतन’ या विषयावर प्रा. मैत्रेयी शिरोळकर बोलत होत्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, समिती सदस्य सुहास पोफळे, शाहीर आसराम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. मैत्रेयी शिरोळकर पुढे म्हणाल्या की, ‘महाविद्यालयात असताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. त्यातून हिंदू तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती ही देशातील अति दुर्गम भागातही रुजली असल्याचे त्यांना आढळून आले. ‘स्वबोध’ या संकल्पनेत स्वतःला जाणून घेताना सर्वात आधी माझे कर्तव्य समजून घेत नंतर आपल्या हक्कांचा विचार केला पाहिजे. मी, माझा परिवार ते राष्ट्र अशी आपल्या कृतिशीलतेची विस्तृत व्याप्ती हवी. शिक्षक म्हणून आपण यासाठी कोणते संस्कार रुजवू शकतो याबाबत शिक्षकांनी चिंतन केले पाहिजे. गुरुकुल शिक्षणपद्धती यासाठी आदर्शवत आहे.
गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, ‘पूर्वीच्या काळात समाजधुरीण आपल्या कृतीतून समाजावर संस्कार करीत होते. आधुनिक काळात शाळेत शिकवतो, तोच शिक्षक अशी शिक्षकाची संकुचित व्याख्या केली जाते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित शाळांमधून आवर्जून भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. समितीने उभारलेल्या राष्ट्रीय संग्रहालयात सुमारे आठ हजार भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास साकार करण्यात येत आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन भावी पिढीतून महापुरुष घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, क्रांतिवीर चापेकर प्राथमिक विद्यामंदिर, खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, बाळकृष्ण चापेकर बालक मंदिर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् या शाळांमधील शिक्षक – शिक्षिकांना मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले. श्रद्धा होनशेट्टी, वैशाली कयापाक, मनीषा ठाकूर या शिक्षिकांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केलीत. अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ऋचा आणि स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनात अतुल आडे, समर्थ डोंगरे, हर्षदा धुमाळ, वृषाली सहाणे, सागर शेवाळे, विशाल पाटील, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सहकार्य केले. सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक नगरकर यांनी आभार मानले.