घर ताब्यात देण्यास सांगितल्याने वडील, भाऊ, बहिणीकडून बेदम मारहाण!

पिंपरी : माझ्या नावावर असलेले घर माझ्या ताब्यात द्या, असे मुलाने म्हटले. या कारणावरून वडील, दोन भाऊ आणि बहीण यांनी व्यक्तीच्या डोक्यात मिरची पावडर टाकून काठी आणि दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२९ मे) सकाळी इंदिरानगर, पिंपरी येथे घडली.
सचिन सुभाष करडे ( वय ४३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडील सुभाष मुरलीधर करडे ( वय ७६), भाऊ अभिषेक सुभाष करडे ( वय ३०), हनुमान उर्फ दिगंबर सुभाष करडे ( वय ३०), बहीण ( वय २५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांच्या नावावर असलेल्या घरात त्यांच्या वडील आणि भावाने भाडेकरू ठेवले होते. ते घर खाली करून त्याचा ताबा आपल्याकडे द्यावा, अशी सचिन यांनी मागणी केली. या कारणावरून वडील सुभाष, भाऊ अभिषेक आणि हनुमान यांनी सचिन यांना दगड व काठीने मारहाण केली. तर बहिणीने सचिन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.

गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : गुटखा विक्री प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (२८ मे) रात्री गांधीनगर, पिंपरी येथे करण्यात आली.
विशाल नंदू निकाळजे (वय ५०, पिंपरी), रियाज अजीज शेख (वय ४६, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार रमेश दोरताले यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी आले होते. पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २६ हजार ६२२ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.

