सांगवीतील बेपत्ता तरुणीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी !

पिंपरी : सांगवी येथील बेपत्ता तरुणीचा मावळ तालुक्यातील लोहगड येथे किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळला. गुरुवारी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तरुणीचा मृतदेह घेरेवाडीकडील बाजूला असलेल्या झाडाझुडपातून बाहेर काढला. मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१, रा. सांगवी) असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे.
मानसी मंगळवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी सकाळी ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. त्यानंतर ती एका टॅक्सी मधून लोहगड येथे एकटी आली. टॅक्सीतून उतरून लोहगडावर जाताना तिकीट काउंटर वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. मानसी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तिचा शोध घेतला. त्यावेळी ती लोहगड येथे आल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तिकीट काउंटर वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये ती दिसून आली. त्यामुळे मानसीचे नातेवाईक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गड परिसरात तिचा शोध सुरू केला. लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरेवाडी कडील बाजूला नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळला. गडावरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.