‘एसआरए’ पूर्ण न करणाऱ्या विकसकास काळ्या यादीत टाका!

तारांकित प्रश्नाद्वारे आमदार अमित गोरखे यांची मागणी
पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) पूर्ण न करणाऱ्या विकसकास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) सुरू आहे. जुन्या झोपडपट्ट्यांचा विकास सुरु आहे. ही कामे विकसकांकडून सुरू आहेत. मात्र, नियोजित वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
अमित गोरखे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक विकसकांकडून वेळेत पूर्ण झालेल्या नाहीत. अशा विकसकांवर कठोर कारवाई करून संबंधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने शासन कोणती कार्यवाही करणार आहे. सद्यःस्थितीत या विकसकामार्फत अन्य किती व कोणत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची कामे मंजूर व सुरू आहेत. संबंधित विकसकांकडून कामे काढून घेऊन ती अन्य योग्य विकसकामार्फत पूर्ण करण्याबाबत शासन कोणती कार्यवाही करेल, याबाबतची शासनाची भूमिका काय आहे. याबाबतचा तारांकित प्रश्न गोरखे यांनी विधिमंडळात उपस्थित केला.
तक्रारी आल्यानंतर संबंधित ठिकाणी नवीन विकसकाला कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असून, निर्धारित वेळेमध्ये अपूर्ण ‘एसआरए’ची कामे पूर्ण करण्यात येतील. तसेच आमदार गोरखे यांनी केलेल्या उपस्थित प्रश्नांबाबत माहिती घेऊन कळविण्यात येईल,असे मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितले.