भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संपर्क मोहिमेत आघाडी!

काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना यांचा मात्र संपर्काचा अभाव
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका संदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संपर्क मोहिमेत आघाडी घेतली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ,काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात मात्र कोणतीच हालचाल दिसून येत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने मंगळवारी निवडणूक संदर्भात बैठक घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक जबाबदारी सोपवली आहे

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हा जोमाने कामाला लागला आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आत्मनिर्भर भारत पंधरवडा साजरा केला जात असून या पंधरवड्यात संपूर्ण शहरात भाजपाचे वातावरण तयार करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः लक्ष देऊन आहेत .पंधरवड्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जनतेशी संपर्क केला जात आहे . पक्ष कार्यकर्यांना निवडणुकीच्या कामाला लागा अ्से सांगण्यात आले आहे.
2017 च्या महापालिका निवडणूकी अगोदर पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. महापालिकेत अजित पवार सांगतील ती पूर्व दिशा या पद्धतीने कामकाज होत होते. मात्र भारतीय जनता पक्षाने 2017 मध्ये आपल्याकडे सत्ता खेचून आणली, त्यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातले आहे .गेल्या आठ दिवसात त्यांचे दोन दौरे शहरात झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न त्याद्वारे केला जात आहे. इतर पक्षात गेलेल्या नाराज मंडळींना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय करण्याचा प्रयत्न अजित पवार हे करत आहेत . अजित पवार यांच्या शहरातील वाढत्या संपर्कामुळे भारतीय जनता पक्ष मात्र अस्वस्थ झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी बैठक घेण्यात आली आणि जोमाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला सुमारे साडेचार लाख मतदान झाले आहे मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा लढवणारे अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटात सामील झाल्याने शरद पवार गटाला यामुळे धक्का बसला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली मात्र विधानसभेनंतर त्यांनी गप्प राहणे पसंत केले आहे .आज ते कोणत्या पक्षात आहेत हे सांगणे कठीण आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे असताना त्यांनीदेखील आजपर्यंत महापालिका निवडणुका संदर्भात कोणताही संपर्क नागरिकांशी केला नाही . काँग्रेस पक्षाचे अस्तित्व या महापालिका निवडणुकीत पक्षाला पुन्हा एकदा शोधावे लागणार आहे. काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते अन्य पक्षात समाविष्ट झाल्याने पिंपरी चिंचवड मध्ये पक्षाला नेता आहे किंवा नाही हा एक संभ्रम आहे .त्यामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती महापालिका निवडणुकीत केविलवाणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तशीच परिस्थिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आहे लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेले माजी महापौर संजोग वाघिरे पाटील हे आज तळ्यात मळ्यात आहेत. याशिवाय माजी नगरसेविका सुलभा उबाळे या एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. महापालिका निवडणूक संदर्भात त्यांनी देखील आजपर्यंत पक्ष वाढीसाठी किंवा नागरिकांच्या संपर्कासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत यामुळे आगामी महापालिका निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते .महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांची युती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होईल किंवा नाही याची शाश्वती नाही.

