भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग!

प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्ग आता प्रत्यक्षात वेगाने आकार घेण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सादर करण्यात आला असून, फुगेवाडी येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा झाली.
या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परंतु या चर्चेत आमदार शंकर जगताप यांनी घेतलेली ठाम भूमिका व सक्रिय सहभाग विशेषतः ठळकपणे जाणवला.
शहराच्या सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा व वाहतुकीवरील वाढत्या ताणाचा विचार करता मेट्रो ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करत आमदार शंकर जगताप यांनी या मार्गाला लवकरात लवकर मंजुरी व निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा केला आहे. उद्योगनगरी चाकणला थेट मेट्रोद्वारे जोडले जाणे ही शहरासाठी ऐतिहासिक पायरी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भविष्यातील नागरीकरण आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन डीपीआरमध्ये (सविस्तर प्रकल्प अहवालात) सुधारणा करून तीन डब्यांच्या ऐवजी सहा डब्यांच्या मेट्रो गाड्या ठेवाव्यात. तीन कार ऐवजी सहा कार असलेल्या मेट्रो गाड्यांची आवश्यकता असून अधिकाऱ्यांना त्यानुसार सुधारणा करण्याची सूचना देण्यात आली.
मेट्रो मार्ग व वैशिष्ट्ये
एकूण अंतर : ४२ किमी , मार्ग : भक्ती-शक्ती चौक → मुकाई चौक → भुजबळ चौक → नाशिक फाटा → चाकण, एकूण स्थानके : ३१, काही मार्गावर बीआरटीएस आणि मेट्रोचे संयुक्त नियोजन , २०३१ मध्ये अपेक्षित प्रवासी संख्या : ३.३८ लाख , २०६१ पर्यंत प्रवासी संख्या जवळपास ७.८० लाख होणार
पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी नवी दिशा
सध्या ३० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवडला चाकण औद्योगिक पट्ट्यासह मेट्रोने जोडल्यास रोजगार, उद्योग व दळणवळण क्षेत्रात नवे पर्व सुरू होईल. वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळेल. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पाचा वेग वाढविण्याची गरज मान्य केली. भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर प्रदेशासाठी ही एक क्रांतिकारी पायरी ठरणार आहे.
