थकबाकीदारानों सावधान; महापालिकेच्या जप्ती पथकांची थेट कारवाई सुरू!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून, थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शहरातील २७ मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी करसंकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरु आहे.
महापालिकेकडून वारंवार आवाहन करून, नोटीस देऊन देखील मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. ही मोहीम पुढील महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून याकाळात मालमत्ताकर थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई होणार आहे अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.
या कारवाईसाठी १८ विभागीय कार्यालयांतील सर्व गटप्रमुखांना जबाबदारी देण्यात आली असून, शहरातील निवासी तसेच बिगरनिवासी थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून विभागीय कार्यालयातील पथकांनी थकबाकीदारांच्या मालमत्तांना भेट देऊन जप्ती प्रक्रिया सुरू केली आहे. दिवसभरात १८ विभागीय कार्यालयांतर्गत १८ पथके वसुली मोहिम राबवत आहेत. आतापर्यंत २७ मालमत्ता सील करण्यात आले असून काही मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन देखील खंडीत करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान १२५ थकबाकीदारांनी तत्काळ कराचा भरणा करून मालमत्तेवरील कारवाई टाळली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने कर वसुलीबाबत आता कठोर भूमिका घेतली आहे. थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यास महापालिकेस जप्ती कारवाई करणे भाग पडणार आहे. विभागीय कार्यालयांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, थकबाकीदारांनी तात्काळ मालमत्ता कराची थकीत रक्कम भरुन सहकार्य करावे. – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


