बँकेच्या अधिकाऱ्याकडून खातेदारांची फसवणूक!

पिंपरी: बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून रक्कम स्वीकारून त्या खात्यात जमा न करता स्वतःसाठी वापरून अपहर केल्याचा प्रकार चिंचवड मध्ये समोर आला आहे. ही घटना 2020 ते 13 जुलै 2023 या कालावधीत जयहिंद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक चिंचवड येथे घडली .
या प्रकरणी बँकेचे वसुली अधिकारी सुधीर आदवडे रा. एकतानगर, पाषाण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार हनुमंत गार्डे (वय 60 रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपी हा बँकेत दैनंदिन ठेव जमा करण्याचे काम करत होता. त्याने बँकेच्या बारा किंवा त्यापेक्षा जास्त खातेदारांकडून 30 लाख 91 हजार 250 रुपये स्वीकारले. मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेची आणि ग्राहकांची फसवणूक केली. याबाबत चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.
गैरसमज झाल्याने तरुणाला मारहाण
पिंपरी :मित्रासोबत चेष्टा मस्करी करत असताना झालेल्या गैर समजातून एका तरुणाला चहा नाश्ता गाड्यांवरील झाऱ्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना सोमवार दोन फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता वाकड भुजबळ चौक येथे घडली.
याबाबत अक्षय ज्ञानोबा मांडेकर (वय31, रा. कोथरूड मूळ रा. डोंगरगाव, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अमोल राजेंद्र गर्जे (रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र हर्षल भिसे हे एकमेकांशी चेष्टा मस्करी करत होते .त्यावेळी ते एकमेकांना शिवीगाळ करत असताना आरोपी अमोल याला असा भास झाला की फिर्यादी हे त्याचा ओळखीचा असलेला हर्षल याच्याशी भांडण करत आहे. याच कारणावरून त्यांच्यात झटापट झाली आणि आरोपीने चहाच्या गाड्यांवरील झार्याने फिर्यादीच्या कपाळावर मारून जखमी केले.


