बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा आता ‘सर्जिकल स्ट्राईक’

आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी अन् पोलिसांकडून ‘ॲक्शन’
पिंपरी : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल. चिखली-कुदळवाडीतील बेकायदा भंगार दुकानांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. शहर आणि देशाच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकाराने ‘कॉम्प्रमाईज’ करण्यात येणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे सरकार चौकशी करुन कारवाई करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’ वर आले आणि कुदळवाडी- चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बेकायदा भंगार दुकाने आणि बांगलादेशी घुसखोरांची आश्रयस्थळे जमीनदोस्त करण्यात आली.
पिंपरी- चिंचवड शहरांमधील म्हाळुंगे, निगडी, पिंपरी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या परिसरात बांगलादेश आणि रोहिंग्ये यांना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले आहेत. भोसरीमध्ये वर्षभरात १२ बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे सर्व बांगलादेशी हे बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत होते. आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर कागदपत्र ही नेहमीच या बांगलादेशकडून जप्त करण्यात आलेले आहेत.
मुळापर्यंत पोहचणे पोलिसांची जबाबदारी
पिंपरी-चिंचवडमध्ये या बांगलादेशींना नेमकं बनावट कागदपत्र कोण बनवून देतो. या मुळापर्यंत पोहचणे देखील पोलिसांची जबाबदारी आहे. बांगलादेशांना आणि रोहिंग्यांची बोगस पासपोर्टदेखील रद्द करण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्ये यांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करावी, अशी अपेक्षा आहे. कुदळवाडी- चिखलीतील अतिक्रमण कारवाई, कामगार नोंदणीबाबत तपासणी करण्यासाठी प्रशासनाने कालबद्ध कार्यवाही करावी,अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.