बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांचा जामीन; गुन्हा दाखल!

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांचा जामीन करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोगस जामीनदारासह बनावट कागदपत्रे तयार करणारी व्यक्ती आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय भागुजी निकम यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ३ महिला आरोपींसह सम्राट बाळा बाळा (वय २३, रा. सह्याद्री कन्स्ट्रक्शन साईट, लेबर कॅम्प, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे, मूळगाव – बहादूरपूर, बांगलादेश) तसेच बनावट जामीनदार म्हणून हजर राहिलेले अनोळखी व्यक्ती व बनावट कागदपत्रे तयार करणारे इतर व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील बांगलादेशी आरोपींनी खोट्या जामीनदारांच्या मदतीने व बनावट कागदपत्रांचा वापर करून न्यायालयाची व पोलिसांची फसवणूक करत जामीन मिळवला. जामीनावर सुटल्यावर संबंधित आरोपींनी पुन्हा कधीही न्यायालयात हजेरी लावलेली नाही. तसेच सध्या ते राहत्या पत्त्यावरही सापडत नाहीत. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

वाकडमध्ये गांजासह युवक अटकेत!
पिंपरी : वाकडमधील कावेरीनगर भाजी मंडईजवळ पोलीसांनी सापळा रचून १ लाख ५५ हजार रुपयांचा गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या युवकास ताब्यात घेतले. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या पथकाने १ मे रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास केली.
अभिषेक मौसलगी (वय २१, रा. लक्ष्मणनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा कर्नाटक राज्यातील गुलबर्ग्याचा रहिवासी आहे. पोलीस शिपाई समाधान कांबळे यांच्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ११०० ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची किंमत सुमारे १.५५ लाख रुपये आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.