फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
अध्यात्म

परमार्थ साधनेसाठी एकांतवास उत्तम

परमार्थ साधनेसाठी एकांतवास उत्तम

श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, ता. १५ :  परमार्थातील साधनेसाठी एकांतवासच सर्वात उत्तम, कारण एकांतवासामध्ये अंगी गुणदोष येत नाहीत, असे सांगत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या गाथा पारायण आणि कीर्तन सोहळ्यातील सहाव्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ह.भ. प. बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन झाले.

त्यांनी चिंतनासाठी याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥ हा अभंग घेतला होता.

बंडातात्या म्हणाले की, लोकांतामध्ये परमार्थ व्यवस्थित होत नाही म्हणून एकांतवासासाठी मला वनांतराला जावे लागते, असे तुकाराम महाराज म्हणतात. एकांतवासाची तीन कारणे तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहेत. पहिले कारण समाजाची परिस्थिती,  दुसरे कारण तुकाराम महाराजांचे दिवाळे निघाले होते, कोणाला तोंड दाखवावेसे वाटत नव्हते आणि तिसरे कारण म्हणजे एकांतवासामध्ये अंगी गुणदोष येत नाही.

संत तुकाराम महाराजांनी एकांत वासात असताना लिहिलेला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा एकच अभंग कळाला तरी महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही. असे बंडातात्या म्हणाले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लोकांतामध्ये किंवा मी घरी राहिलो तर माझ्या परमार्थ विषयक प्रेमाला दृष्ट लागेल. म्हणून मी एकांतात जातो. परमार्थात आपले प्रेम जतन करावे.

तुकाराम  महाराज म्हणतात मी अद्वैत मानत नाही. कारण त्यामुळे माझे भजन होत नाही. लंकेमध्ये अशोकवनात असणाऱ्या सीतेचा आणि त्रिजटेचा संवाद भक्तिमार्गातला सर्वोत्कृष्ट संवाद आहे,  असे महाराज म्हणाले. अहं ब्रह्मास्मि हे प्रमा ज्ञान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भ्रम आहे कारण त्यामुळे आमचे भजन बंद होईल. आमची कामना आहे तुझे नाम घ्यावे आणि जर आम्ही निष्काम झालो तर नाम थांबेल म्हणून एकांतवास आम्हाला प्रिय आहे.

ते म्हणाले की, खळाच्या मुखाने अद्वैत श्रवण करणे,  मी ब्रह्म आहे या ब्रह्मवृत्तीत सतत राहणे व त्यामुळे भक्ती न करणे हे मला मुळीच आवडत नाही. कीर्तनाच्या शेवटी ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे आणि आयोजक ह. भ. प. छोटे माऊली कदम यांचे कौतुक केले. मावळ हा मवाळ म्हणजेच प्रेमळ लोकांचा प्रांत आहे. बारा मावळ मधील लोकांनी शिवरायांना स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मदत केली, असे महाराज म्हणाले.

वृक्षारोपणातून साकारत आहे गाथाबन
बंडातात्या यांनी सांगितले की, शिवाजीराव मोरे नावाचे गृहस्थ श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसरात आठ एकरात ४५३८ झाडे लावणार आहात आहेत. गाथेच्या देहू प्रतिनुसार गाथेमध्ये तेवढेच अभंग आहेत. झाडं मोठी झाल्यावर प्रत्येक झाडाला प्रत्येक अभंगाची पाटी लावायची. त्याला नाव द्यायचे गाथाबन. अशी त्यांची संकल्पना आहे.

देगलूरकर महाराजांची कीर्तनसेवा

सोहळ्यातील सातव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन झाले. चिंतनासाठी त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचा सुपरिचित असा अभंग घेतला.

याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

तुकाराम महाराज आपल्या जीवनातील धन्यता, निश्चितता आणि त्याचे झालेले कौतुक या अभंगात वर्णन करतात. भंडारा डोंगराच्या पायाशी हा सोहळा असल्यामुळे तो भव्य आहे आणि दिव्य पण आहे. देगलूरकर महाराज म्हणाले की, संत एकटे अवताराला येत नाहीत. अवताराला येण्यापूर्वीच त्यांचे जीवनाचे ध्येय ठरलेले असते,  साधनही ठरलेले असते. तुकोबाराय अवतारला येणार म्हणून भंडारा डोंगर,  इंद्रायणी नदी,  तुकोबांच्या हातातील वीणा हे पण अवताराला आले. अभंगातील स्वरांनीही त्या ठिकाणी अवतार घेतला.

भव्यता आणि दिव्यता दोन्ही या सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. मंडप भव्य आणि सप्ताह व त्याची प्रेरणा ही दिव्य आहे. वैकुंठ गमन करण्यापूर्वी तुकोबाराय सप्ताहाला भेट देऊन जातील अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. ज्ञानोबा तुकोबांना अभिप्रेत असणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात जिवंत आहे हे सोहळ्यातून दिसून येते, असे गौरवोद्गार महाराजांनी काढले.

जीवनाची तुष्टता ही तृष्णेच्या निवृत्तीत असते. त्रैलोक्यातील दिव्य सुख हे तृष्णेच्या त्यागामुळे प्राप्त झालेल्या सुखाच्या काही अंशच असते. संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमानकाळ असावा आणि संतांचा वर्तमानकाळ हा आपल्या भविष्यकाळ असावा. मानवी जीवन हे पुरुषार्थाने धन्य होत असते, असे ते म्हणाले. 

जीवदशा संपते तो शेवटचा दिवस. चिंतामुक्त दिवस, ब्रह्मज्ञान होण्याचा दिवस तो शेवटचा दिवस. मरताना तोंडी देवाचे नाव आले तर शेवटचा दिवस गोड होतो. आपली कर्तव्य संपून लोककल्याणासाठीचे जगणे सुरू होते तो आपला दिवस शेवटचा. आपली धन्यता सिद्ध झाल्यानंतर ती धन्यता लोकांना देण्यासाठी कटिबद्ध होणे हा मानवी जीवनाचा शेवटचा दिवस व संत जीवनाचा पहिला दिवस ठरतो. सर्वांना बरोबर घेऊन परमार्थाला लागणे म्हणजे चार दिवस खेळीमेळी. पुरुष ठरलेल्या आयुष्यात जे काही करतो, मग तो संसार असो वा पूर्व संस्काराने पंढरीची वारी, हरी कथा आणि नामसंकीर्तनादी भक्ती असो,  ती त्याची खेळीमेळी असते, करमणूक असते. ते करण्यात त्याची कर्तव्य बुद्धी नसते पण विशेष हा आहे की मुक्ती नंतर संसार न करता भक्ती करणाऱ्याला संत पदवी प्राप्त होत असते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"