पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी मधील नेहरूनगर येथे एका अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (७ मार्च) रात्री दहा वाजता नवीन पिंपरी कोर्टाजवळ केली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील नवीन कोर्टाजवळ एकजण गावठी कट्टा घेऊन आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.
वाकडमध्ये गावठी कट्टासह तरूणाला अटक
पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने रविवारी (दि.९) सकाळी वाकड येथे कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
साद यासीन सय्यद (वय १९, रा आदर्श कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रामदास मोहिते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डनच्या भिंतीलगत एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून साद सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीच्या एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.