जगभरातून गौरविलेली काम्या कार्तिकेयन कोण आहे?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : जगातल्या सर्वात उंच असलेल्या माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न अनेकांच्या उराशी बाळगलेले असते. पण ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट फार कमी जणांना साध्य करता येते. असंच उद्दिष्ट साध्य करणाऱ्यांपैकी एक म्हणजे मुंबईतली काम्या कार्तिकेयन आणि शिवाय हे स्वप्न तिने वयाच्या फक्त १६ व्या वर्षी पूर्ण केले आहे, ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे. त्यामुळे जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव आहे.
काम्याचे वडील कमांडर एस कार्तिकेयन हे भारतीय नौदलात अधिकारी आहेत. मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये ती बारावीमध्ये शिकते आहे. या बापलेकीनं २० मे २०२४ मध्ये माउंट एव्हरेस्ट (८८४९ मीटर) उंचीपर्यंत यशस्वी चढाई केली होती. काम्याने आतापर्यंत सात खंडातील सगळ्यात उंच सहा पर्वतांची चढाऊ यशस्वीरित्या केली आहे. अंटार्टिकामधील माउंट विन्सन मॅसिफ याची चढाई करणे हे या वर्षीच्या डिसेंबरमधील टू डू लिस्ट मध्ये समाविष्ट आहे. जेणेकरून जगातील सात सर्वात उंच पर्वत शिखरे सर करण्याचे आव्हान पूर्ण करणारी ती जगातली सगळ्यात लहान मुलगी ठरणार आहे.
काम्या सहा एप्रिल रोजी काठमांडू येथे पोहोचली होती. अनेक दिवसांच्या नियोजनानंतर शिखराची अंतिम चढाई १६ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथून सुरू झाली. आणि २० मे रोजी सकाळी शेवटच्या टप्प्यासाठी चढाई सुरू झाली.काम्याने २०१५ पासून हिमालयातील गिर्यारोहणास प्रारंभ केला आहे. सात वर्षाची असताने तिने चंद्रशीला शिखर (१२ हजार फूट) सर केले. त्यानंतर केदारकांठा शिख, रूपकुंड अशा कठीण मोहिमा सर केल्या. २०१७ या वर्षी मे महिन्यात नेपाळ इथून एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची चढाई तिने केली आणि अशी संधी मिळालेली ती जगातली दुसऱ्या क्रमांकाची मुलगी ठरली. काम्याने २०१९ मध्ये भृगु धबधब्यातही ट्रेक केला आहे.
बालपणापासून गिर्यारोहणाची आवड
काम्याची आई लावण्या के. कार्तिकेयन या नेव्हीच्या केजी स्कूलमध्ये मु्ख्याध्यापिका आहेत. त्यांचे पती एस. कार्तिकेयन यांचं पोस्टिंग लोणावळा येथे असताना त्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेकदा ट्रेकिंगचा अनुभव घेतला आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे काम्याला सुद्धा गिर्यारोहणाची आवड लहानपणापासूनच होती. वयाच्या तिसऱ्या वर्षीच तिला गिर्यारोहणाचे आकर्षण वाटू लागले. सातव्या वर्षी तिने आई-वडिलांबरोबर उत्तराखंडमधील एक शिखर आणि वयाच्या नवव्या वर्षी लडाखचे टोक गाठण्यात यश मिळविले. काम्या सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
पंतप्रधानांकडून गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काम्याच्या यशाचे कौतुक यापूर्वीच मन की बात या कार्यक्रमातून केले आहे. पंतप्रधान बाल शक्ती पुरस्काराने काम्याचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार विशेष कामगिरी करणाऱ्या भारतातील लहान मुलांना दिला जातो.