आर्मी हवालदाराची वर्दी फाडली; तरुणावर गुन्हा

पिंपरी : दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) या संस्थेत खासगी काम करणार्या कामगाराने आर्मी हवालदाराची वर्दी फाडली. अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी खासगी कामगार तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री घडली.

अर्जुसिंग अतरसिंग (वय २०, रा. सीएमई, दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. उत्तमकुमार कन्हैयासिंह (वय ३८, रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तमकुमार हे सीएमई दापोडी येथे आर्मी हवालदार आहेत. आरोपी अर्जुसिंग हा सीएमईमध्ये आईसोबत राहतो. तेथे तो बुटपॉलीशचे काम करतो. सोमवारी रात्री अर्जुसिंग याने मद्य प्राशन केले. त्याने उलटी करून गोंधळ घातला. त्यामुळे उत्तमकुमार यांनी त्याला समजावून सांगत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याने उत्तमकुमार यांना धमकी देत त्यांची वर्दी फाडली. त्यांच्या अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला. फौजदार कांबळे तपास करीत आहेत.