स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांना मान्यता

पिंपरी : शहरातील विविध भागात जलवाहिन्या व जलनिस्सारण वाहिन्या टाकणे तसेच दुरुस्ती करणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, विविध भागातील रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक २,६, १३,१७,१८,२५ मध्ये रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे करणे, स्थापत्य विषयक कामे करणे या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. प्रभाग क्रमांक २३ थेरगाव येथे जलनिस्सारण नलिका टाकणे, चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत मोशी, डूडूळगाव, चोविसावाडी, चऱ्होली, वडमुखवाडी आदी परिसरात जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करणे, भोसरी, लांडेवाडी येथे जलनिस्सारण नलिका टाकणे, निगडी साईनाथनगर, यमुनानगर येथील नाल्याची उंची वाढविण्याबाबतच्या विषयाला प्रशासक सिंह यानी मान्यता दिली.
कावेरीनगर, वेणूनगर, कस्पटे वस्ती परिसरात पाण्याची लाईन टाकणे, पिंपळे निलख, वाकड, ताथवडे, पुनावळे भागात पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, शहरातील विविध भागातील विकासकामांचे अवलोकन करणे, महापालिकेच्या नवीन कार्यालयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांना देखील प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने शहरातील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी जे शौचालय दुरावस्थेत आहेत अथवा मोडकळीस आले आहेत त्यांचे सर्वेक्षण करून ते निष्कासित करणे तसेच महापालिकेच्या थेरगाव येथील शाळेच्या इमारतीचा चौथा मजला वाढविण्याबाबतच्या कामाचा २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात समावेश करणे आदी विषयांना देखील प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.