पीएमपीएल बसचे चाक डोक्यावरून गेल्याने अज्ञात व्यक्तीचा मृत्यू!

आळंदी : आळंदी बस स्टॉप वर पीएमपीएल बस गाडी पार्किंग करीत असताना पीएमपीएलच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार ११ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पीएमपीएल बस स्टॉप, आळंदी, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी राजेंद्र विक्रम कोल्हे पोलीस हवालदार, आळंदी पोलीस स्टेशन यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हनुमान ज्ञानोबा जाधव (वय 27, पीएमपीएल बस ड्रायव्हर, मूळ – कापशी, ता. पालन, जि. परभणी सध्या रा. पुणेकर बिल्डिंग, चाकण चौक, आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या बस ड्रायव्हरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्यांच्या ताब्यातील पीएमपीएल बस आळंदी पीएमटी बस स्टॉप येथे पार्कींग करीत असताना हायगयीने, निष्काळजीपणाने बस चालवून बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली एका अनोळखी व्यक्तीच्या अंदाजे (वय 35) यांच्या डोक्यावरून चाक जाऊन त्याचा मृत्यू झाला. अज्ञात मयत इसम याच्या अंगावर जांभळ्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर पांढऱ्या व निळ्या रंगाचे पट्टे असलेला व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेल्या व्यक्तीचे वर्णन आहे .आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काकडे हे पुढील तपास करत आहेत.

