फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
क्रीडा

मोशीतील इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ‘दृष्टीक्षेपात’

मोशीतील इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ‘दृष्टीक्षेपात’

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडला स्पोर्ट्स हब बनवण्याचा संकल्प केला होता. त्याअनुशंगाने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूल उभारण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले आहे.

बीकेसीतील कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर प्रकल्प
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक भूखंड महाराष्ट्र क्रिकेट असोशिएन (MCA) मार्फत विकसित करुन चांगल्या प्रकारचा स्पोर्ट्स क्लब शहराला उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये इंटरनॅशनल मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित होणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल व जलतरण इत्यादी खेळासाठी व खेळाडुंना चालना मिळणार आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस कायमस्वरुपी मिळकतकर उपलब्ध होणार आहे. सदर प्रकल्प ‘‘बांधा, अर्थपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा’’ तत्त्वावर सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे (PPP) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा या प्रकल्पावर खर्च होणार नाही.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मौजे मोशी येथे गट क्र. ४४२ पै. व गट क्र. ४४५ पै मध्ये मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्र. १/२०४ मध्ये स्टेडिअमचे प्रयोजन आहे. सदर ठिकाणी बहुउद्देशीय क्रिडा संकुल उभारण्याबाबत महापालिका सभा क्र. ३९१ मध्ये दि. २५ जुलै २०२३ रोजी मंजूर करण्यात आला होता. प्रस्तावित ठिकाणी ४.५६ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित आहे. त्या ठिकाणी स्टेडिअम होणार आहे.

या संदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्पोर्ट्स सिटी’ बनवण्याचा संकल्प आम्ही ‘भोसरी व्हीजन- २०२०’ मध्ये केला होता. त्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्र, आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, इंटरनॅशनल बॉक्सिंग सेंटर, स्केटिंग ग्राउंड असे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत. या पुढील काळात पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्याचा मानस आहे. त्याचे नियोजन नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडिअममध्ये करण्यात येत आहे. तसेच, मोशी येथे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूलसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन प्रकल्प उभारणी सुरू करावी आणि राज्यातील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचीही पायाभरणी करावी, अशी अपेक्षा आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"