जर्मनीला निघालेल्या श्रावणी टोनगे हिचा अजित पवार याचे हस्ते सत्कार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार याचे हस्ते श्रावणीचा सत्कार करण्यात आला.

स्वच्छतेविषयक घोषवाक्य व मॅस्कॉट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ च्या अनुषंगाने स्वच्छतेविषयक घोषवाक्य व मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. घोषवाक्य स्पर्धेमध्ये ३४२ प्रवेशिका आल्या होत्या. या स्पर्धेत गिरीश कुटे यांनी पारितोषिक पटकावले आहे. तर मॅस्कॉट डिझाईन स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये अतुल वाघमैतर यांच्या मॅस्कॉट डिझाईनला पारितोषिक मिळाले आहे. या दोघांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून त्यांना पारितोषिक देण्यात आले.
‘हरित सेतू’ प्रकल्प ब्रँड डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित सेतू प्रकल्पाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ब्रँड डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३ लाख रुपये हे प्रज्ज्वल जयसिंग दिंडे यांनी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक २ लाख रुपये रोहित राजेंद्र घोडके यांनी आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रत्येकी ५० हजार रुपये अमोल सोनू दर्डी व शौर्य भारद्वाज यांनी मिळवले आहे. तसेच विशेष ज्युरी पारितोषिक नासीर मेहबूब शेख यांनी पटकावले आहे. या सर्व विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकाची रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, स्पर्धेचे ज्युरी हेड आश्विनी देशपांडे, आयटीडीपीच्या काश्मिरा मेढोरा, पीडीएचे प्रसन्ना देसाई, असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे रंजना दाणी, पौर्णिमा भुरटे, चंद्रशेखर बडवे, ऋग्वेद देशपांडे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.