‘एआय’ मुळे रोजगार संकल्पनेत बदल : महावीर मुथा

पीसीसीओईआर मध्ये ‘देव कार्निवल’चे उत्साहात उद्घाटन
पिंपरी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एआय मुळे रोजगाराच्या संधी जातील अशी भीती व्यक्त केली जाते; परंतु हे खरे नाही. यामुळे रोजगारांच्या संधी, संकल्पना यामध्ये बदल होणार आहे. नव अभियंत्यांनी नोकरी च्या मागे धावण्याऐवजी स्टार्टअप सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे गुगल डेव्हलपर ग्रुपच्या पुणे विभागाचे प्रमुख महावीर मुथा यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे नेक्स्ट जनरेशन डेव्हलपमेंट क्लब च्या सहकार्याने ‘देव कार्निवल’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी कुशल विजय, साज्ञिक घोष, रॉबिन बंटा, तरुण अभिचंदानी, अमोल निटवे, देवेंद्र यादव, पीसीसीओईआर प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सेंट्रल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले, प्रा. डॉ. महेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.
‘देव कार्निवल’मुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. भविष्यात विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आयटी, ऑटोमेशन, औद्योगिक क्षेत्रात कसे बदल होत आहेत आणि होणार आहेत याची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, यामुळे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावत जातील असे डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या चर्चासत्र मायक्रोसॉफ्टचे कुशल विजय यांनी जनरेटिव्ह एआय आणि त्याचा वापर करून करिअर कसे घडवायचे याविषयी मार्गदर्शन केले. वॉर्कहॅटचे सह-संस्थापक आणि सीईओ साज्ञिक घोष यांनी नो-कोड डेव्हलपमेंट याची माहिती दिली. एसएएसआर अँड डीचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर देवेंद्र यादव यांनी गिटऑप्स आणि त्याचे व्यावहारिक अनुप्रयोग याची माहिती दिली. टीसीएसचे सायबर सिक्युरिटी युनिट – डिलिव्हरी पार्टनर रॉबिन बंटा यांनी सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. गुगलचे वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण अभिचंदानी यांनी औद्योगिक जगातील संधीची माहिती दिली. इव्हॉल्व्हिंगएक्सचे संस्थापक आणि सीईओ अमोल निटवे, एक्सप्लोरव्हीआरचे सह-संस्थापक आणि मियावाकी एक्सप्रेस यांनी उद्योजकतेबद्दलची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

स्वागत डॉ. अर्चना चौगुले, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सूत्रसंचालन अर्णव वाणी, काव्या अगरवाल यांनी केले. तर आभार डॉ. सोनाली लुणावत यांनी मानले. पुष्कर सारडा, यश यादवाडकर, मल्हार गुजर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. सुमारे चारशे विद्यार्थी कार्निवल मध्ये सहभागी झाले होते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते.