विनेश पुन्हा मैदान गाजवणार?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पॅरिसहून शनिवारी विनेश मायदेशी परतल्यानंतर तिचे नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. १२५ किलोमीटर लांबीचा प्रवास करत ती बलाली या मूळ गावी पोहोचली आणि त्यानंतर तिने तिच्या निवृत्तीवर अखेर भाष्य केले.
या प्रवासात वाटेत अनेक ठिकाणी खाप पंचायती आणि ग्रामस्थांनी विनेश फोगाटचे स्वागत केले. गावात पोहोचताच प्रथम हनुमान मंदिरात तिनं दर्शन केलं. गावातील क्रीडा स्टेडियममध्ये ग्रामस्थ आणि अनेक सामाजिक संस्थांनी विनेशचा गौरव केला. स्टेजवरच विनेशची तब्येत बिघडली. यानंतर विनेशने खुर्चीवर बसून लोकांना संबोधित केले.
“आमची लढाई संपलेली नाही. लढा चालूच राहील आणि सत्याचा विजय होईल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या देशवासीयांकडून, माझे गाव आणि कुटुंबातील सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम मला या संकटावर मात करण्यास मदत करेल. मी कुस्तीकडे परत जाऊ शकते. ऑलिम्पिक पदक गमावणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आहे. यातून सावरायला मला किती वेळ लागेल माहीत नाही. आज मला मिळालेले धैर्य योग्य दिशेने वापरायचे आहे,” असे विनेशने सांगितले.
ती म्हणाली, ” मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, अशा गावात माझा जन्म झाला. गावाचे ऋण फेडण्यासाठी आज मी माझी भूमिका बजावेण. गावातील प्रत्येक घरात एक बहीण असावी जी माझे कुस्तीतील विक्रम मोडू शकेल. मी माझ्या बहिणींना शक्य तितकी मदत करेन आणि प्रशिक्षक म्हणूनही काम करेन.”
कुस्तीपटू विनेश फोगाटने अनेक अडचणींवर मात करत अखेर ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकाच्या फेरीपर्यंत पोहोचली. तिला फायनलमध्ये हरवणे जवळजवळ अशक्यच होते परंतु केवळ १०० ग्रॅम अधिकच्या वजनाने तिचे अंतिम सामना खेळण्याचे आणि सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.