पॅरालिम्पिक गाजविण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकनंतर भारतीय पॅरा खेळाडू पॅरालिम्पिक गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच पॅरालिम्पिक स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनीही बुधवारी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला आणि अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “१४० कोटी भारतीय पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या आमच्या भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत. प्रत्येक खेळाडूचे धैर्य आणि दृढनिश्चय संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. ” पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पॅरिसमध्ये झाला. शारीरिक, दृष्य आणि बौद्धिक अपंग असलेले चार हजाराहून अधिक खेळाडू पुढील ११ दिवसांत विविध २२ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवितील.
भारतीय खेळाडूंचा सहभाग
भारताने यंदा पॅरिस पॅरालिम्पिकसाठी खेळाडूंचा सर्वात मोठा समूह पाठवला आहे. यंदा एकूण ८४ भारतीय खेळाडू विविध १२ खेळांमध्ये भाग घेण्यासाठी पोहोचले आहेत. यात ४६ पुरूष आणि ३८ महिला खेळाडूंचा समावेश आहे. पूर्वी, भारताने २०२० टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण ५० खेळाडू पाठवले होते, ज्यामध्ये ४० पुरुष आणि १४ महिला होत्या. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने विक्रमी १९ पदके जिंकली होती. यावेळीही भारताला विक्रमी पदक मिळण्याची आशा आहे. यावेळी भारत पॅरा सायकलिंग, पॅरा रोइंग आणि ब्लाइंड ज्युडो या ३ नवीन खेळांमध्ये सहभागी होणार आहे.
महाराष्ट्रातून कोणते खेळाडू सहभागी?
सचिन खिलारी (गोळाफेक), संदीप सरगर (भालाफेक), दिलीप गावित (४०० मीटर), भाग्यश्री जाधव (गोळाफेक), सुकांत कदम (बॅडमिंटन), मानसी जोशी (बॅडमिंटन), ज्योती गडेरिया (सायकलिंग), स्वरूप उन्हाळकर (नेमबाजी) आणि सुयश जाधव (जलतरण) या खेळाडूंचा समावेश आहे.