विनेश फोगाटची कुस्तीतून निवृत्ती

परिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटनं तडकाफडकी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. या संदर्भात सोशलमीडियावरून तिनं एक पोस्ट लिहून शेअर केली आहे. त्यात आपण कुस्तीतून निवृत्त होत असल्याचं तिनं म्हटलं आहे.
ऑलिम्पिक गेम्समध्ये विनेश फोगाटबद्दलचा कालचा अपात्रतेचा निर्णय जितका धक्कादायक होता, त्याहीपेक्षा धक्कादायक बातमी आज सकाळी क्रीडाप्रेमींना मिळाली. विनेशनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अतिशय भावूक पोस्ट लिहित तिनं कुस्तीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलेलं नाही. अलविदा कुस्ती २००१ – २०२४. मी कायमच तुझी ऋणी राहीन, मला माफ कर. असं म्हणत तिनं देशवासियांची सुद्धा माफी मागितली आहे.
ऑलिम्पिक्स २०२४ मध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाचं स्वप्न घेऊन गेलेली विनेश फोगाट अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यामुळं काल सुवर्णपदकाचं स्वप्नं भंग पावलं होतं. त्याता तिला खूप मानसिक त्रास झाला. अपात्र ठरवलं गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
विनेश फोगाट ही ५० किलोग्रॅमच्या गटात कुस्ती खेळत होती. मात्र, सामन्यापूर्वी तिचं वजन ५० किलोग्रॅमपेक्षा काही ग्रॅम अधिक दाखवत होतं. सामन्यापूर्वी तिचं वजन फक्त १०० ग्रॅमनं जास्त असल्यानं तिला अपात्र ठरवलं गेलं. ती आता रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र ठरू शकणार नाही. उपान्त्य फेरीत विनेश फोगाटनं उत्तम कामगिरी केली होती. सहाजिकच सुवर्ण पदकासाठी देशवासियांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. क्यूबाची कुस्तीपटू गुजमान लोपेजी हिला विनेशनं ५-० असं हरवलं होतं.