कुटुंब, शिक्षण आणि समाजावरही व्यसनाचे गंभीर परिणाम: प्रवीण मोरे

नशामुक्त समाजासाठी महिलांची भूमिका या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : व्यसनामुळे फक्त आरोग्यावरच परिणाम होत नाही तर कुटुंब, शिक्षण आणि समाजावरही त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. तसेच अनेक गुन्हे व कौटुंबिक समस्या या व्यसनामुळेच घडतात यासाठी व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे मत सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे दोन) प्रवीण मोरे यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नशामुक्त समाजासाठी महिलांची भूमिका या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त गुन्हे शाखेच्या वतीने सोमवार 9 मार्च रोजी चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज चिंचवड येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील अमली पदार्थ विरोधी पथक यानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास महिला उद्योजिका श्रीमती राजश्री गागरे, मानसोपचार तज्ञ श्रीमती डॉक्टर नेहा कोंडे, व्यसनमुक्ती समूपदेशक विल्यम साळवी हे उपस्थित होते.
प्रवीण मोरे पुढे म्हणाले की तरुणांनी आपली ऊर्जा, वेळ आणि क्षमता चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. शिक्षण, कौशल्य आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर आपण स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवू शकतो. तसेच निरोगी जीवनशैली स्वीकारून शिक्षण, क्रीडा आणि चांगल्या सवयी मध्ये स्वतःला गुंतवा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करताना केले
.श्रीमती राजश्री गागरे म्हणाल्या की, समाजात महिलांची भूमिका खूप महत्त्वाची असून आई-बहीण किंवा पत्नी म्हणून महिला या कुटुंबातील सदस्यांना योग्य मार्ग दाखवू शकतात. व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी योगदान देऊ शकतात .महिलांनी देखील समाजात व्यसनमुक्ती बाबत जागृती करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती डॉक्टर नेहा कोंडे यांनी व्यसनाच्या आहारी गेल्यास होणाऱ्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामाची माहिती देत मार्गदर्शन केले. विल्यम साळवी म्हणाले की, मित्रांचा दबाव, तणाव, नैराश्य किंवा चुकीचे आकर्षण यामुळे व्यसनाची सुरुवात होते. चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि योग्य मार्गाने चालण्याच्या निर्णयामुळे तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते. याबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याबाबत शपथ देत मार्गदर्शन केले .
यावेळी पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले की, आपल्या परिसरात अमली पदार्थ बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अमली पदार्थ विरोधी पथक मोबाईल क्रमांक 8600002320 वर संपर्क साधावा किंवा जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क करावा आपली ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगितले.

