मुंबईतले सेलिब्रिटी असुरक्षित?

आज पहाटे अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात चाकू हल्ला; सैफवर होणार शस्त्रक्रिया
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या इसमाने अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करत पोबारा केला. जखमी सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरात एक इसम आज पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने शिरला. चोर घरात शिरल्याचे समजताच घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला. गोंधळ ऐकून सैफ झोपेतून जागा झाला आणि बाहेर आला. तेव्हा त्याच्या खोलीबाहेर चोर उभा होता. आता आपण पकडले जाणार या भीतीने चोराने जवळच्या चाकून सैफवर हल्ला केला. झटापटीत सैफला दुखापत झाली. तीन, चार ठिकाणी जखमा झाल्या. घडला प्रकार लक्षात येताच कर्मचारी सैफजवळ धावले आणि त्यांनी तातडीने लीलावती रुग्णालय गाठले. या गोंधळाचा फायदा घेत चोर घरातून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सैफच्या घरी धाव घेतली. प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, पोलिसांनी गेटवरील आणि विविध सीसीटिव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार चोराचा माग काढण्याच येणार आहे. चोर घरात घुसून थेट सैफच्या खोलीपर्यंत आला, याचा अर्थ त्याने घरात घुसण्यापूर्वी रेकी केली होती, याचा संशय व्यक्त केला जात आहे. सैफची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र, प्रकृतीबाबत आणखी सविस्तर माहिती कुटुंबियांनी अद्याप दिलेली नाही.
एकूणच, बॉलिवुडमधील अभिनेत्यांना किंवा एकूणच सेलिब्रिटींना सतत येणाऱ्या धमक्या, फोन, निनावी पत्र यामुळे या क्षेत्रातील सेलिब्रिटींवर कायमच भीतीची छाया असते. अभिनेता सलमान खान याला सतत येणाऱ्या धमक्यांचे फोन, पत्र यामुळेही मागील काही काळात तणाव वाढला होता. अभिनेता शाहरूख खा याला देखील यापूर्वी धमक्या आलेल्या आहेत. मुंबईतील जुहू, बांद्रा हा परिसर प्रामुख्याने सेलिब्रिटी, उद्योगपतींची निवासस्थाने असणारा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सुरक्षेबाबतही आता चिंता व्यक्त केली जात आहे.