चऱ्होली परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना लुटणाऱ्या आरोपींना अटक!

पिंपरी : दिघी, आंळदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली परिसरात पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत दोन आरोपींना गुन्हे शाखेने ७२ तासात अटक केली आहे. त्या आरोपींकडून १२ जबरी चोरीचे तसेच एक वाहन चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. यव्हाण भास्कर कासार (वय २४ वर्षे, रा. सणसवाडी, पुणे) आणि विश्वजीत अर्जुन पवार (वय २३ वर्षे, रा. मुकुदवाडी, संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी-आंळदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२१ आणि दि.२२ फेब्रुवारी रोजी ही प्राईड वर्ल्ड सिटी चऱ्होलीगाव परीसरात पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या ८ नागरिकांना, पुणे ग्रामीण हद्दीत एक आणि पुणे शहरातील ५ नागरिकांना तीन जणांनी चोरीच्या बाईक वरून येऊन चाकुचा धाक दाखवून मौल्यवान वस्तु जबरीने हिसकावून नेल्या होत्या. या घटनेबाबत तात्काळ दिघी पोलीस व आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर गुन्हे शाखेचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, व युनिट ०३ चे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला. सतत ३ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन आरोपींच्या येण्याजाण्याच्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीची पाहणी करुन आरोपी निषन्न केले. त्या आरोपींचा शोध घेत असताना चऱ्होली परिसरात सदर आरोपी संशयीतरित्या फिरताना दिसुन आले. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने आरोपींचा पाठलाग करुन यव्हाण भास्कर कासार आणि विश्वजीत अर्जुन पवार या दोन आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडे एक धारधार कुकरी व चोरीची मोटार सायकल यूनिकॉर्न (क्र. एम.एच.११ सी. झेड ७५७८) ही मिळुन आली. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी (दि.२१ आणि दि.२२ रोजी) चऱ्होली परिसरात मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे कबूल केले. तसेच त्याच दिवशी पुणे ग्रामीण येथे एक आणि पुणे शहर येथे ३ गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींनी आतापर्यंत १२ जबरी चोरी तसेच एक वाहन चोरी केल्याचे देखील उघडकीस आले आहे.
यातील आरोपी विश्वजीत अर्जुन पवार हा जालना जिल्ह्यात चार गुन्ह्यात वॉन्टेड होता. त्याच्यावर पुर्वीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी यव्हाण भास्कर कासार याच्यावर पुर्वीचे २ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीची मोटार सायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता दिघी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास दिघी पोलीस करित आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी मालमता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिंतेद्र कदम, खंडणी विरोधी पथकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देंवेद्र चव्हाण, पोलीस उप निरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडील पोलीस हवालदार मोरे, गडदे, पोलीस नाईक कोकणे, पोलीस शिपाई कदम, आत्तार, खंडणी विरोधी पथकाकडील सहायक पोलीस फौजदार कानगुडे, पोलीस हवालदार जाधव, पोटे, गोडांबे, गुन्हे शाखा युनिट-०३ कडील पोलीस हवालदार सोनवणे, साबळे, पोलीस शिपाई राळे, तांत्रिक विशलेषण विभागाचे पोलीस हवालदार ननावरे यांनी केली आहे.