आकुर्डीतील डी वाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्बची अफवा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील कॉलेजला आलेल्या एका मेलमुळे आज खळबळ उडाली. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील हे कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे करण्यात आली. मात्र, एकही संशयित वस्तू न आढळली नाही. मेलद्वारे अफवा पसरविणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.
अज्ञात इसमाकडून कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचा मेल आल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तातडीने पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. यानंतर लगेच काही वेळाने पोलिस डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये पोहोचले. एकूणच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने पावले उचलली. कॉलेजमध्ये सध्या परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थित होती. मात्र, धमकीचा मेल आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढावं लागलं. त्यांना कॉलेजमधून बाहेर सुरक्षितस्थळी पाठवण्यात आलं. यानंतर डॉगस्कॉड तिथे दाखल झाला. तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक कॉलेजमध्ये दाखल झालं. या पथकाने परिसराची पाहणी केली मात्र, कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही.
याप्रकरणात कुणीतरी खोडसाळपणे धमकीचा मेल केला असावा, असा अंदाज आहे. दरम्यान, ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध सुरु आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे हे महाविद्यालय आहे. माहविद्यालय बॉम्बने उडवून देण्याचा मेल आल्याने सर्वजण हादरले. मात्र ही निव्वळ अफवा असाल्याचे समोर आले आहे.