शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचे महिला बचत गटांमार्फत होणार सर्वेक्षण!

शहर नियोजनासाठी “पीसीएमसी @५०” उपक्रमांतर्गत लवकरच सर्वेक्षणास सुरुवात होणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ साली ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचा सर्वेक्षण उपक्रम राबविणार आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील विविध स्वयं सहायता गटातील (SHG) २५० हून अधिक महिला सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी महिला बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पीसीएमसी@५०” शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात प्रतिनिधित्व सुनिश्चित करत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये महिला बचत गटांमार्फत शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक, नोकरदार वर्ग, झोपडपट्ट्यांतील कुटुंबे, गृहसंकुलातील रहिवासी, सामाजिक संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थाचे देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारे हे सर्वेक्षण तीन आठवड्यांत पूर्ण होणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये महापालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये हा सर्वेक्षण उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १,५०० हितधारकांच्या सहभागासह, फोकस गट चर्चा (FGDs) यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यातून महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद या उपक्रमांमध्ये घेण्यात आली आहे. “पीसीएमसी@५०” या शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरी वाहतूक, पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यासाठी आयोजित फोकस गट चर्चा आणि नागरिक सर्वेक्षणातून मिळणारी माहितीच्या आधारावर महापालिकेच्या भावी योजनांचा पाया ठरणार आहे.
पीसीएमसी@५०” सर्वेक्षणासाठी महिला बचत गटांना महानगरपालिकेमार्फत प्रशिक्षण*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ सालापर्यंत ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. यासाठी सोमवार (२८ एप्रिल) रोजी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे टाटा स्ट्राईव्ह व महापालिकेच्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सर्वेक्षकांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.