विनेश, तू फिनिक्स व्हावंस..

विनेश, थोडी घाई केलीस असं नाही वाटत का? अर्थात भारतात निवांत बसून अनेकांना हा प्रश्न पडलाच असेल. पण तुझ्या आतापर्यंतच्या जिद्दीचा प्रवास पाहता, तूच खणखणीत सोन्याचं नाणं आहेस आणि आम्हाला तू तशीच `दंगल` निर्माण करणारी धाकड गर्ल
हवी आहेस. आता तू फिनिक्स व्हायला हवंस..
पदकांचं स्वप्न घेऊन गेलेल्या पॅरिसमध्ये जेव्हा अंतिम स्पर्धेत पाऊल ठेवण्यापासूनच तुला रोखलं गेलं तिथंच आमचा श्वास रोखला गेला. तिथं खेळाच्या पंढरीत आदल्या दिवशी देशाची आणि स्वतःची सुद्धा मान उंचावणाऱ्या तुला दुसऱ्या दिवशी जेव्हा खेळू दिलं गेलं नाही, तेव्हा भारतीयांची जी अवस्था झाली, तिथं त्या सगळ्याला तू कशी सामोरी गेली असशील याची कल्पनाच करता येत नाही. तुला सपोर्ट करणारे आणि प्रोस्ताहन देणारे लेखच्या लेख प्रसवू लागले होते. तू जिद्दीनं उभी राहा, डगमडू नकोस, तूच आमचं सोनं आहेस हे सांगण्यासाठी लोक सोशल मीडियाचा आधार घेत होते. त्याक्षणी तुझ्यापर्यंत हे आवाज पोहोचले नसतील. पण जेव्हा तुझ्यापर्यंत हे प्रेम पोहोचेल तेव्हा तरी तुला फिनिक्स भरारी घ्यावी असं आतून वाटेल.
तुझ्याबद्दल लिहायला घेतलं तोपर्यंत तू निवृत्ती जाहीर केली नव्हतीस. तेव्हा खरंतर विचार होता, की तूच आमची गोल्डन गर्ल कशी आहेस, हे लिहावं. पण तुझ्या तडकाफडकी निवृत्ती घेतल्याची बातमी हातात आली आणि आता या गोल्डन गर्लनं फिनिक्स व्हावं असं वाटू लागलं. आजपर्यंत प्रतिस्पर्ध्याशी, समाजाशी, व्यवस्थेशी तू लढतच आलीस. अनेक खडतर लढती पार करून पुढे गेलीस. जिथे कुठे अन्याय झाला तिथं तुझ्यातल्या वेदनेची कळ उसळून बाहेर आली. इथल्या व्यवस्थेला कंटाळून, अन्यायाला न मिळालेली दाद आणि निराशा पदरी आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी उचललेली गंभीर पावलं तरी व्यवस्थेचे डोळे उघडतील असं वाटलं. पण तसं फारसं समाधानकारक काहीच घडलं नाही. पण आपल्या मातीतल्या मुलींना तुझ्यासारखं घडवायचं असेल तर तुला फिनिक्स व्हावंच लागेल. व्यावस्थेतल्या दलदलीत मुलींवर अन्याय होऊ द्यायचा नसेल तर तुला फिनिक्स व्हावंच लागेल.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये तू ५० किलो वजनी गटातून मैदानात उतरलीस, तेव्हापासूनच तू कशी चुकीची होतीस आणि कशी अट्टाहासाने पुढे आलीस, याचा हिशेब आता काही जण मांडायला घेतीलही, नव्हे हा हिशेब मांडायला काहींनी सुरुवातही केली आहे. पण तुझा पूर्वीपासूनचा लढा कोट्यवधी नागरिकांनी पाहिला आहे. याच कुस्तीच्या मैदानात उतरणाऱ्या मुलींच्या न्यायासाठी काही महिन्यांपूर्वी तू लढत होतीस. ती जिद्द, चिकाटी, आक्रोष, क्रोध, अन्यायाविरुद्धची चीड सगळं आम्ही पाहिलं आहे.
परवा सेमाफायनलचा सामना जिंकल्यावर प्रतिस्पर्धी क्यूबाची खेळाडू गुजमान लोपेजी हिला मॅटवर लोळवून जेव्हा उठण्याची संधीच दिली नाहीस आणि तुझा विजय जेव्हा तुला दिसला तो चेहरा अगदी बोलका होता. लिहिणाऱ्याचे हजार शब्द त्या एका चेहऱ्यातून बोलते झाले. मी करून दाखवलं, मी तिला हरवलं हे भाव तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट टिपता आले. त्याचक्षणी तुझा आणखी एक चेहरा आठवला तो म्हणजे, नवी दिल्लीत तू महिला कुस्तीगीरांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध केलेल्या आंदोलनातला. तुला हाताला धरून फरफटत नेतानाचा, आक्रोष करतानाचा चेहरा आठवला. हे दोन्ही चेहरे भारतातल्या लेकींनी लक्षात ठेवायला हवेत. आपल्या हक्कासाठी लढणं आणि जे ठरवून मिळवून दाखवायचं होतं, ते मिळवणं. या दोन गोष्टी प्रत्येकीसाठी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत.
शांत आणि संयमी चेहऱ्यानं तू खेळत आलीस. कुस्ती हा आक्रमक क्रीडा प्रकार असूनही चेहऱ्यावर कोणतेही आक्रमणाचे भाव न दाखवता प्रतिस्पर्ध्याला ओळखून तू तुझी चपळाई आणि कुस्तीतलं कसब प्रत्येक सामन्यात दाखवलंस. तुला जे कुस्तीतून शिकायला मिळालं आणि त्याच ज्ञानानं तुला जगापुढे धाकड गर्ल म्हणून उभं केलं, त्या विद्येसाठी तुला फिनिक्स व्हावंच लागेल. ऑलिम्पिक स्पर्धा आणि पदकं हे समीकरण आम्ही आत्ता कुठे भारताच्या नावाशी जोडू लागलो होतो. तोपर्यंत तू, साक्षी मलिक यांसारखे मोहरे या समीकरणातून गळू लागले. पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत ही समीकरणं आणखी पक्की होण्यासाठी विनेश, तुला फिनिक्स व्हावं लागेल..
–सीमा देसाई
1 Comment
फारच चटका लावून गेली ही घटना.