पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)या आजाराची रुग्णसंख्या राज्यात ठिकठिकाणी आढळत असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे एका रुग्णाने जीव गमावला आहे. हा ३६ वर्षीय तरूण पिंपळे गुरव येथील रहिवासी होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हा तरूण २१ जानेवारी रोजी दाखल झाला होता. मात्र, दाखल केल्यापासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. गेले आठ दिवस त्याला वाचविण्यासाठी वायसीएम मधील डॉक्टरांनी प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. पुणे शहर परिसरात जीबीएसचे आतापर्यंत १३० रुग्ण आठळले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचा मृत्यू जीबीएसमुळे झाला आहे.
पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेला हा तरूण उपचारांसाठी दाखल झाला तेव्हाच त्याची प्रकृती बिकट होती. तो ओला-उबेर टॅक्सी चालक होता. त्यामुळे तो कामाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या परिसरात जात असे आणि तेथील मिळेल ते पाणी पीत असे. परिणामी त्याने अलिकडे कोणत्या परिसरातील पाणी प्यायले होते, ज्यामुळे त्याला जीबीएसची लागण झाली आहे, याचा उलगडा झालेला नाही.
ताप, सर्दी आणि अशक्तपणा जाणवल्यामुळे तो रुग्णालयात दाखल झाला होता. दाखल होताच त्याचा त्रासही वाढला त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. विविध चाचण्या करत असताना एक्स-रे रिपोर्टमध्ये आढळले की त्याच्या फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यादृष्टीने उपचारही झाले. मात्र, त्यात यश आले नाही.