फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

पोर्शे प्रकरणातील मुलाला शिक्षण प्रवेश मिळेना!

पोर्शे प्रकरणातील मुलाला शिक्षण प्रवेश मिळेना!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील कल्याणीनगर येथील ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाला शिक्षणासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर त्याला पुण्याबाहेर दिल्लीतील एका नामवंत संस्थेनं बीबीए शाखेतील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश देऊ केला नाही.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील हा अल्पवयीन मुलगा अपघात झाला तेव्हा बारावीत होता. त्याला पुढे पदवीचे शिक्षण घ्यायचे आहे. बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या शाखेतून पदवी घेण्याची त्याची इच्छा आहे. मात्र, अपघातात प्रसंगी त्याने मद्यपान करून कार चालविल्याने दोन निष्पाप बळी गेले आणि देशभरात या अपघात प्रकरणावरून संतापाची लाट निर्माण झाली होती. अशातच आता त्याला पुढचे शिक्षण घेण्यासाठी मात्र शिक्षण संस्था त्याला प्रवेश नाकारत आहेत.

या मुलाच्या आगामी शिक्षणामध्ये कोणतीही बाधा येऊ नये, अशी मागणी त्याच्या वकिलांनी गुरुवारी बाल न्याय मंडळाकडे केली. त्यावर या मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही आडकाठी होऊ नये, अशी भूमिका विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सुद्धा मांडली आहे. बाल न्याय मंडळाने देखील सरकारी वकिलांच्या भूमिकेचे कौतुक केले; परंतु बचाव पक्षाने कोणताही अर्ज न दिल्याने त्यावर आदेश झाला नाही.

अल्पवयीन कार चालकावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणी झाली. या वेळी अपघाताच्या घटनेनंतर या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्याच्या वकिलांनी बाल न्याय मंडळाच्या निदर्शनास आणून दिले. हा मुलगा बारावी उत्तीर्ण झाला आहे. त्याला ‘बीबीए’ करायचे आहे. त्यासाठी त्याने दिल्लीतील व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या एका नामांकित शिक्षण संस्थेकडे प्रवेश अर्ज केला होता. मात्र, या संस्थेने मुलाला प्रवेश देण्यास नकार दिल्याचे त्याच्या वकिलांनी बाल न्याय मंडळाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रसंगी दिल्लीतील शिक्षण संस्थेचे वकीलही उपस्थित होते. पण बचाव पक्षाने कोणताही लेखी अर्ज केला नसल्याने त्यावर कोणतेही आदेश झाले नाहीत.

तसेच या मुलाचा पासपोर्ट मिळविण्यासाठी कुटुंबियांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला होता. यासंदर्भात कुटुंबियांना पोलिसांकडे अर्ज करता येईल, असे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"