महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभमधील सेक्टर १८ आणि १९ मधील अनेक मंडपांना अचानक आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कल्पवासींनी रिकामे केलेल्या काही जुन्या तंबूंमध्ये आग लागल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
आग लागताच अवघ्या १० मिनिटांत अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गर्दीला घटनास्थळावरून हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत अयोध्याधामचा लवकुश आश्रम जळून खाक झाला होता. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. याआधी ९ फेब्रुवारीला देखील महाकुंभ मेळ्यात आगीची दुर्घटना घडली होती. अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी होत्या. त्यावेळीही अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली होती.