फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

“संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार”: अजित पवार

“संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार”: अजित पवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने त्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. अशातच राज्यातील महायुती सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. यासह हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या युद्धाचं स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जाहीर केलं. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे शिवाजी महाराजांचं स्मार्क उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी आज केली.

अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मी घोषणा करतो.

पानिपत येथे स्मारक उभारणार
अजित पवार म्हणाले, “स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.

आग्र्यात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार
मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"