कुंभमेळ्याला जाताना भोसरीतील दाम्पत्याचा अपघाती मत्यू

आणखी एका महिलेने गमावले प्राण; एक जण गंभीर जखमी
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जात असताना इनोव्हा गाडीचा अपघात होऊन भोसरीतील बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. यात आणखी एक महिलेनं प्राण गमावले असून अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरजवळ हा अपघात झाला आहे.
मध्यप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये विनोद नारायण पटेल (वय ५०), शिल्पा विनोद पटेल (४७, दोघे रा. स्पाईन सिटी चौक, एमआयडीसी भोसरी) आणि निरू नरेशकुमार पटेल (४८, रा. भेळ चौक, प्राधिकरण निगडी) यांचा मृत्यू झाला. तर नरेशकुमार रवजी पटेल (४८, रा. भेळ चौक, प्राधिकरण निगडी) हे जखमी झाले आहेत.
नरेशकुमार पटेल आणि विनोद पटेल हे एकमेकांचे मित्र होते. नरेशकुमार आणि त्यांची पत्नी निरु तसेच विनोद आणि त्यांची पत्नी शिल्पा हे चौघेही प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी इनोव्हाने (क्रमांक एमएच १४ केएफ ५२००) जात होते. त्यावेळी मध्यप्रदेशातील जबलपूर जवळ महामार्गावरील पुलाच्या कठड्याला त्यांची कार धडकली. यात विनोद, शिल्पा आणि निरु यांचा मृत्यू झाला. गुजरातमधील अरवल्ली जिल्ह्यातील धनसुरा तालुक्यातील लालूकंपा या त्यांच्या मूळगावी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.