मालमत्ता हरकतींचा निपटारा ऑनलाइन!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे, कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्या नागरिकांना मालमत्तेबाबत हरकत दाखल करावयाची असेल त्यांनी ऑनलाइनरीत्या हरकत दाखल केल्यानंतर त्यावर तत्काळ निपटारा आणि हरकतीवर सुनावणीसुद्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांनी हरकत दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ८,५५,१०२ मालमत्तांना सलग अनुक्रमांक (जिओ सिक्वेन्सिंग) देण्यात आले असून ५,३२,३०७ मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप करण्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत करण्यात आलेल्या मोजमाप प्रक्रियेमध्ये नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांपैकी ५२,७८७ मालमत्तांपर्यंत विशेष नोटिस १ चे वाटप करण्यात आले असून यामधील २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या असून त्यापैकी १६,९५३ मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांना अंतिम बिल मिळाले आहे. यामधील ४,२६१ मालमत्ताधारकांनी ८,९९५४,२८९ रुपये कराचा भरणा केला असून ४,१३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरुपात कर भरुन त्यावरील सवलतींचा लाभ घेतला आहे.
आत्तापर्यंत विशेष नोटिस १ मिळालेल्या मालमत्ताधारकांपैकी २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या असून यापैकी २०,४७५ मालमत्ताधारकांनी ऑफलाइन पद्धतीने, तर २,१०६ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात हरकती दाखल केल्या आहेत. नागरिकांनी मिळालेल्या नोटिसवरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीनेच नोटिस मान्य करून आपले बिलसुद्धा प्राप्त करावे व त्यानंतर आपला मालमत्ताकराचा भरणाही ऑनलाइन स्वरूपात करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्या मालमत्ताधारकांना विशेष नोटिस १ प्राप्त झाल्यानंतर नोटिस अमान्य असल्यास हरकत दाखल करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेबाबत, करयोग्य मूल्य मान्य नाही, आकारणी दिनांक मान्य नाही, करपात्र क्षेत्रफळ मान्य नाही, मालमत्तेवरील नावामध्ये चूक, मालमत्तेवरील पत्ता चुकीचा, मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी चुकीचा इत्यादीबाबत हरकती दाखल करता येत आहेत. नागरिकांनी अशा हरकतींबाबत आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीनेच पूर्तता करून हरकतीवर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष नोटिस प्राप्त झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत वरील हरकती असतील तर त्या दाखल करणे आवश्यक असणार आहे, असे आवाहन करसंकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.
ज्या मालमत्तांची चालू वर्षी नव्याने आकारणी झाली आहे, अशा मालमत्तांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मालमत्ताधारकांनी आगाऊ कर भरल्यास ५ टक्के तर ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के, झिरो वेस्ट आणि ‘एसटीपी प्लॅंट’ कार्यान्वित असल्यास १० टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरात सर्वच मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणांर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांना विशेष नोटिस १ वाटप करण्यात येत आहे. ज्या मालमत्ताधारकांना आपल्या नोटिसवर हरकती नोंदवायच्या असतील, अशा मालमत्ताधारकांनी नोटिसवर दिलेल्या ‘क्यूआर कोड’द्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून ऑनलाइन पद्धतीने जलद गतीने निपटारा करण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले की, शहरातील सर्व प्रकारातील मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तेबाबत हरकत घेण्यासाठी यापूर्वी करसंकलन कार्यालयास भेट देण्याची प्रक्रिया होती. नागरिकांना हरकतींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी महापालिकेद्वारे ऑनलाइन स्वरूपातही विशेष नोटिस मान्य असल्यास पेमेंट करण्याची व अमान्य असल्यास हरकती दाखल करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी सदर प्रक्रियेचा लाभ घेऊन आपल्या वेळेची व श्रमाची बचत करावी.
कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले की, नव्याने आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा ऑनलाइन स्वरुपात भरणा मालमत्ताकराचे बिल लागू झालेल्या दिनांकापासून तीन महिनेच्या विहीत मुदतीत करुन त्यावरील विविध सवलतींचा लाभ घ्यावा. जर मालमत्ताधारकांनी विहित मुदतीमध्ये मालमत्ताकराची रक्कम न भरल्यास सवलतींचा लाभ मिळणार नाही. तरी मालमत्ताधारकांनी विहित मुदतीमध्ये ऑनलाइन स्वरुपात कराचा भरणा करावा. त्याबरोबरच, शहरातील नव्याने आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी आपले बिल मिळण्यासाठी विशेष नोटीस स्वीकारल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना करसंकलन विभागात येऊन कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी आपला वेळ खर्च करावा लागणार नाही. करसंकलन विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या प्रक्रियेचा अवलंब जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी घ्यावा.