फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
क्रीडा

२७ वर्षांनी इराणी करंडक मुंबईकडे

२७ वर्षांनी इराणी करंडक मुंबईकडे

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने २७ वर्षांनी इराणी कप २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा रणजी करंडक विजेता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळली गेली. दोन्ही संघांतील हा सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजयी घोषित करण्यात आले.

पाचव्या दिवशी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तनुष कोटियनने शतकी खेळी साकारली. तत्पूर्वी पहिल्या डावात सर्फराझ खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ५३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अभिमन्यू ईश्वनच्या १९१ धावांच्या खेळीनंतरही रेस्ट ऑफ इंडिया संघाला ४१६ धावाच करता आल्या. ज्यामुळे मुंबईला १२१ धावांची आघाडी मिळाली होती.

१९९७ नंतर प्रथमच मुंबई संघाला इराणी चषक पटकाविता आला. मुंबईने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्याची ही १५ वी वेळ आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावा केल्या होत्या, तर उत्तरादाखल रेस्ट ऑफ इंडिया ४१६ धावा करण्यात यशस्वी ठरला. पहिल्या डावात सर्फराझशिवाय कर्णधार रहाणेने ९७ धावांची खेळी खेळली होती.

मुंबईकडून पृथ्वी शॉने दुसऱ्या डावात ७६ धावा केल्या. तनुष कोटियनने दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने १५० चेंडूत ११४ धावा केल्या, ज्यात १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्याशिवाय मोहित अवस्थीने ५१ धावांचे योगदान दिले. मुंबईने ३२९ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. मुंबई संघाने तब्बल २७ वर्षांनंतर इराणी चषक जिंकला आहे.

कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियासाठी काही खास कामगिरी करु शकला नाही आणि ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिमन्यू ईसवरनने १६ चौकार आणि १ षटकारासह १९१ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ९३ धावांची खेळी केली. इशान किशनला केवळ ३८ धावा करता आल्या. रेस्ट ऑफ इंडियाचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले. या कारणामुळे रेस्ट ऑफ इंडियाला केवळ ४१६ धावा करता आल्या. पहिल्या डावात १२१ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. टीम इंडियातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने अगोदर रणजी चषक आणि आता इराणी चषक उंचावला आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"