विद्यार्थ्यांना मिळणार अनौपचारिक पर्यावरण शिक्षण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती आणि संवर्धनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीची बैठक मुख्य प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (१९ सप्टेंबर) झाली. यामध्ये अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पातून पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित होण्यास मदत होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
अनौपचारिक पर्यावरण शिक्षण प्रकल्पांतर्गत तीन प्रकल्प सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यानंतर विस्ताराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे साडेनऊ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचा पर्यावरणीय बुद्ध्यांक विकसित करण्यास मदत होणार असून, पालिकेच्या शाळांचा नावलौकिक वाढणार आहे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक शिक्षणातील अनुभव, निसर्ग वाचन, सभोवतालचे पर्यावरण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत सजग करण्यासाठी उपक्रम महत्त्वाचा ठरणारा आहे. हा उपक्रम पुण्यातील निसर्ग जागर प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविला जाणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवडमधील हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी आराखडा मंजूर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका यांच्यामार्फत पीएमपीएमएलसाठी शंभर इलेक्ट्रीक बसेस आणि शंभर सीएनजी बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुणे पालिका ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड पालिका ४० टक्के हिस्सा भरणार आहे.
या अनुषंगाने शंभर सीएनजी बसेसबैकी ४० बसेस खरेदी करण्यासाठी २७ कोटी ४० लाख रुपये रक्कम पीएमपीएमएलला अदा करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बसखरेदी प्रक्रियेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याच्या धोरणाला पालिकेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पीएमपीएमएलची सेवा पर्यावरणीयदृष्ट्या सक्षम करणे होय. हा मुद्दा प्रस्ताव मान्यतेच्यावेळी लक्षात घेण्यात आला.
बैठकीत मंजूर विषय
- पिंपरीतील सुविधा भूखंड विकसित
- स्मार्ट कामांसाठी सल्लागार नियुक्त
- स्थापत्य सुधारणा विषयक कामे
- ताथवडे रस्त्याची सीओईपीमार्फत तपासणी
- लांडेवाडीत पंपिंग मशिनरी बसविणे