सांगवी-बोपोडी पुलाच्या सुशोभीकरणासाटी 21 कोटी

पिंपरी : महापालिकेच्या वतीने सांगवी-बोपोडीदरम्यान मुळा नदीवर उभारण्यात येणा-या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाच्या कामासाठी 32 कोटी 36 लाखांचा खर्च करण्यात आला असताना आता या पुलाच्या सुशोभीकरणावर तब्बल 20 कोटी 65 लाखांचा खर्च केला जाणार आहे.
या पुलाच्या उभारणीसाठी आतापर्यंत एकूण 32 कोटी 36 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. हे काम टीॲण्डटी इन्फ्रा लिमिटेड कंपनी करत आहे. कामाची मुदत 2 वर्षे होती. मात्र, पुण्याकडील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राची जागा मिळण्यास विलंब झाल्याने ठेकेदाराला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप पुलाचे काम पूर्ण झाले नसून, त्यावरून वाहतूक, रहदारी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुलाच्या कामाला उशीर हाेत असतानाच आता पुलाच्या सुशोभीकरणासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, आता सुशोभीकरणावर तब्बल 20 काेटी 65 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या नव्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. हे कामदेखील टीॲण्डटी इन्फ्राला देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे पुलाचे सुशोभिकरण करण्यासाठी माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार, पुलाचे संकल्पचित्र तसेच प्राथमिक आराखडा बनविण्यात आला. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर 25 ऑगस्टला सादरीकरण करण्यात आले. त्यांनी आराखड्यात बदल सुचविले. त्यानुसार, तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यानुसार पुलाचे सुशोभिकरण करण्यात येणार येत आहे.