उत्सव व्हावा शांततेत; प्रशासनाचे आवाहन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक तसेच शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह येथील नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात केले आहे.
प्लॅस्टिकचा वापर करू नका
गणेशोत्सवात रस्ता पदपथांवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही. सार्वजनिक मंडळ परिसरात फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने कमीत कमी असतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनाच्या अधिनियमानुसार प्लॅस्टिक पिशव्या व इतर प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी असल्याने त्यांचा वापर टाळावा अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वाहतुकीला अडथळा करू का
रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रिक्षा सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे बंधनकारक आहे. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती ठेवण्याची किंवा इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध जागेमध्येच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास किंवा मंडप उभारण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून रहदारीस किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
संशयित वस्तू? पोलिसांना बोलवा
गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंडळाजवळ हजर स्वयंसेवक, कार्यकर्ते, नागरिक यांनी मद्यसेवन करु नये तसेच मद्यसेवन केलेल्या व्यक्तीला मंडळाच्या मंडपाजवळ येण्यास प्रतिबंध करावा. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये. काही अनोळखी, संशयित, बेवारस वस्तु उदा. सूटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरताना रेंगाळताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना संपर्क साधावा. गणेश मूर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणाऱ्या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीं च्या मूर्तींचे संरक्षणाकरीता मंडळाचे कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी, असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ध्वनिक्षेपकाचा वापर कमी करा
सार्वजनिक गणेश मंडळानी श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात सीसीटीव्ही बसविणेबाबत कार्यवाही करावी. आणि श्रींच्या आरती आणि पुजेवेळी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विद्युत रोषणाईचा व ध्वनिक्षेपकाचा वापर कायदेशीर मर्यादेत करावा. आणि ध्वनीची पातळी नियंत्रीत ठेवावी. सार्वजनिक मंडळांनी नागरिकांना श्रीं च्या दर्शनाकरीता दृकश्राव्य किंवा डिजीटल माध्यमांचा वापर करावा. मंडळांनी श्री गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदी द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करावा. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम २००० मधील परिच्छेद ४ चे तरतूदीप्रमाणे रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी १०० मीटरचे परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये तसेच मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा कमीत कमी वापर करावा.