फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
क्रीडा

गरोदरपणात धाडसी क्रीडा प्रकार योग्य?

गरोदरपणात धाडसी क्रीडा प्रकार योग्य?

``तुम्हाला मंचावर खेळताना दोन खेळाडू दिसल्या असतील; पण तिथे प्रत्यक्षात आम्ही तिघं होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ“ तेव्हा कुठे सगळ्या जगाला कळलं की ऑलिम्पिक २०२४ मध्ये तलवारबाजी करणारी ॲथलिट नादा हाफेज ही सात महिन्यांची गर्भवती होती. पण गरोदर असताना असा धाडसी क्रीडा प्रकार खेळावा का, असा प्रत्येकाच्या मनात उमटलेला प्रश्न आहे. काय सांगतात तज्ज्ञ…

प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपण ही एक तारेवरची कसरत असते. मग ती गृहिणी असो वा नोकरदार स्त्री असो आणि कोणत्याही आर्थिकस्तरातली स्त्री असो. याही पलिकडे जर ती ॲथलिट असेल, तलवारबाजी करत असेल आणि ऑलिम्पिकसारख्या जागतिकस्तरावरच्या मैदानात उतरून स्वतःला सिद्ध करत असेल, तर मानसिक आणि शारीरिक पातळीवर केवढी मोठी कसरत ती करत असेल, याची कल्पना कोणालाही येणार नाही. पण सात महिन्यांचा गर्भ पोटात असताना जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यात धोका नाही का?

काय घडलं नादा हाफेजच्या बाबतीत?
पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये तलवारबाजीची स्पर्धक नादा हाफेजची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे सात महिन्यांची गर्भवती असतानाही ती नुकतीच पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळली आहे. नादा हाफेज ही २६ वर्षीय अॅथलीट आहे आणि ती फेन्सिंग हा क्रीडा प्रकार म्हणजेच तलवारबाजी करते. यंदा पोटातल्या बाळासह तिनं ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये विजयी सलामीही दिली आणि अंतिम १६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. मात्र, त्यानंतर तिला पराभव पत्करावा लागला.

विशेष म्हणजे तिची मॅच झाल्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली, जी वाचल्यानंतर नादा गर्भवती असल्याचं सर्वांना समजलं आणि सगळेच अवाक् झाले. तिनं या पोस्टमध्ये लिहिलं की, सात महिन्यांची गरोदर ऑलिंपियन… तुम्हाला मंचावर खेळताना दोन खेळाडू दिसल्या असतील; पण तिथे प्रत्यक्षात आम्ही तिघं होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि माझ्या पोटात वाढणारं बाळ.

नादा हाफेज काय म्हणते?
माझ्या आणि माझ्या बाळासमोर अनेक आव्हानं होती. ती आव्हानं शारीरिक आणि भावनिक, अशा दोन्ही प्रकारची होती. गरोदपण हे एरवीही तारेवरची कसरत असतं. परंतु, जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे कितीही कठीण असलं तरी ते समाधानकारकही होतं. अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवता आलं याचा मला अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. या प्रवासात नवरा इब्राहिम इलहाबनं माझ्यावर विश्वास ठेवला आणि कुटुंबानंही साथ दिली. मी तिसऱ्यांदा ऑलिंपिक खेळत आहे. यात यंदा एका छोट्या ऑलिंपियनची साथ मिळाली आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे.

वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात?
दरम्यान, तलवारबाज नादा हाफेजच्या या धाडसाचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र गर्भधारणेदरम्यान असे धाडसी खेळ खेळणं कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच विषयावर वेगवेगळ्या व्यासपीठांवर, समाज माध्यमांवर वैद्यकीय तज्ज्ञांनी मतं व्यक्त केली आहेत. गरोदरपणात तलवारबाजीसारखे लढाऊ खेळ खेळल्यानं आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यात मुख्यत: पोटदुखीचा त्रास अधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता असते; ज्यामुळे प्लेसेंटल अॅबडॉमिनल, अकाली प्रसूती किंवा गर्भाला इजा होण्याचा धोका अधिक असतो. तसंच जलद हालचालींमुळे पडणे किंवा चक्कर येण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी काही महत्त्वाच्या सुरक्षेची खबरदारी घेतली पाहिजे, असं काहींचं म्हणणं आहे.

अशा धाडसी स्पर्धेत आरोग्य आणि गर्भधारणा यांच्या स्थितीबाबतची काळजी घेण्यासाठी प्रसूतीतज्ज्ञांचा नियमितपणे सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जोखीम कमी करण्यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसे की, कठोर परिश्रम आणि शारीरिक हालचाली टाळणे गरजेचे आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"