मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

पुणे : आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानी लोकप्रतिनिधीच्या हक्कांचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची केली मागणीपुण्यातील हवेली मतदारसंघामधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक २४ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. परंतु या बैठकीवरून राजकारण चांगलंच तापलंय. आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आमसभेचे आयोजन केले होते. त्यामुळे सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक तुम्ही पुढे ढकलावी अशी विनंती आमदार संजय जगताप यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या विनंतीला मान न देता माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक घेतल्याने संजय जगताप आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री यांनी पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेचा अपमान केला आहे. असं करणं लोकप्रतिनिधीच्या अधिकारपदाचा भंग असल्याचं आमदार जगताप म्हणाले.
लोकप्रतिनिधीने आमसभा बोलावली असताना इतर कोणतीही मीटिंग घेता येत नाही. हा माझ्या विशेष अधिकारांचा भंग होतो. त्यामुळं विशेष अधिकारांचा भंग आणि अवमानाची सूचना यासंदर्भात काल मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना समक्ष भेटून याबाबतच्या सूचनेची नोटीस आपण मुख्यमंत्री महोदयांना काढावी, अशी विनंती मी केली आहे आणि त्या प्रकारची नोटीस मी विधानसभा अध्यक्षांना दिलेली आहे
पंधरा दिवसांमध्ये याविषयी कारवाई होईल आणि विशेष अधिकारांचा भंगाविषयी जी कमिटी आहे, त्यापुढे त्यांना बोलावलं जाईल, असे आमदार जगताप म्हणाले.