पिंपरी-चिंचवडमध्ये गढूळ पाणी

पिंपरी, प्रतिनिधी : गेल्या काही तासांत पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोसायट्यांमधील किंवा गृहसंस्थांमधील पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पावसाच्या पाण्यामुळे अथवा दूषित पाणी गेल्यामुळे वापरण्यास अयोग्य झालेले असू शकते, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
खबरदारी म्हणून नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी करू नये. तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे जेणेकरून रोगराई पसरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पाणीपुरवठा विषयक तक्रारींसाठी सारथी अथवा प्रभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तक्रारींचे निवारण तातडीने करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.