कृष्णेच्या पात्रातली स्टंटबाजी भोवली

प्रतिनिधी, सांगली : सांगलीत कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलावरून स्टंटबाजी करू नये, तसेच नदीचे पाणी वाढल्यामुळे पात्रात पोहण्यासही उतरू नये, असा पोलिसांनी दिलेला इशारा डावलून स्टंट करणाऱ्या तरूणांना त्यांची स्टंटबाजी अंगलट आली आहे.
कृष्णा नदी सध्या इशारा पातळीच्या आसपास आहे. अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली.
कृष्णा नदीची पाणी पातळी ३८ फुटांवर आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. परिणामी सांगलीमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पाणीपातळी सध्या ३८ फुटांवर गेली असल्याने इशारा पातळी सायंकाळपर्यंत गाठणार आहे.
पात्रात स्टंटबाजी करणे, या तरुणांना चांगलीच अंगलट आली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहू लागले. सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला. थंड पाणी, मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काय करावे काही कळत नव्हते.सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदी उडी घेऊन या तरुणांचा जीव वाचवला. हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाव्य पुराची स्थिती ओळखता जिल्हा कारागृहातील सुमारे ८० कैद्यांच कोल्हापुर येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. आणखी काही कायद्यांचं स्थलांतरित करण्यात येणार आहे. सांगलीतील मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट, काका नगर या भागातील पूरग्रस्त कुटुंबीयांना महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे.