फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
अध्यात्म महाराष्ट्र

तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

देहू, प्रतिनिधी : नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया, सुख देईल विसावा रे, या आंतरिक भावनेने आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे शुक्रवारी दुपारी प्रस्थान ठेवले. या वेळी नभ दाटून आले होते अन् अवघे वैष्णव आनंदमय होऊन तुकोबा-तुकोबा जयघोष करीत होते. इंद्रायणी काठी चैतन्याचा सोहळा रंगला होता.

आषाढी वारीसाठी पालखीचा ३३९ वा सोहळा देहूत साजरा झाला. संतांचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अवघा वारकरी संप्रदाय आतुरला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दाखल झाला होता. रिमझिम पावसात पहाट उजाडली. मुख्य मंदिरात सोहळ्याची लगबग सुरू झाली. पहाटे साडेपाच वाजता श्रींची महापूजा झाली. त्यानंतर परंपरेप्रमाणे शिळा मंदिर आणि पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात पूजा करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर सकाळी दहा ते बारा वेळेत भानुदास महाराज मोरे यांच्या काल्याचे किर्तन झाले.

गावातील घोडेकर सोनार यांच्याकडून उजळून आलेल्या पादुका वाजतगाजत इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. या ठिकाणी वंशज दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रथेप्रमाणे म्हसलेकर कुटुंबियांनी पादुका डोक्यावर घेत मुख्य मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी चरणासमोर ठेवल्या. तेथून पालखी सोहळा प्रमुखांनी पादुका डोक्यावर घेत भजनी मंडपात चौरंगावर ठेवल्या. या ठिकाणी निमंत्रितांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते.

वरुणराजासह अन्य देवदेवतांची विधीवत पूजा झाली. त्यानंतर पादुका विविधरंगी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीमध्ये ठेवण्यात आल्या. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष झाला. संस्थानतर्फे विणेकरी, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी खांद्यावर घेत भाविकांनी मंदिर प्रदक्षिणा घातली. मार्गावर कुंचे पताकाचे भार घेऊन वैष्णव दुतर्फा उभे होते. टाळ घोळ चिपळ्याचा नाद करीत नाना बागडीचे छंद जोपासत होते. पायाने ताल धरला होता. मृदंगाने आसमंत दुमदुमला होता. हातात टाळाचा गजर चालू होता. अन् मुखात विठूरायाचा जयघोष चालू होता. विठूरायाच्या भेटीची वाट गवसल्यामुळे भक्तांना अमाप आनंद झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले होते.

मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर अकलूज आणि बाभूळगावच्या अश्वांसमवेत पालखीने महाद्वारातून इनामदार वाड्याकडे प्रस्थान ठेवले. या ठिकाणी पहिला मुक्काम असणार आहे. शनिवारी (२९ जून) पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडनगरी सज्ज आहे.

मोठ्या प्रमाणावर अन्नदान

अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म, या भावनेने देहूमध्ये आलेला वारकरी उपाशी राहू नये, यासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचा उपक्रम राबविला. त्यासाठी संत तुकाराम अन्नदान मंडळ, श्रीमंत नवशा गणपती अन्नदान ट्रस्ट, हनुमान मंडळ, भैरवनाथ मंडळ, देहूरोड वैश्य समाज मंदिर यांनी पुढाकार घेतला. शासनातर्फे मंदिरात वैद्यकीय पथक कार्यरत होते. नगरपंचायतीने सोयी-सुविधा पुरविल्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"