Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

25th October 2026
सांस्कृतिक

‘मराठी लावण्यां’पासून ‘स्वरशांता’पर्यंत आणि शाहिरी पोवाड्यांचा कलाविष्कार!

‘मराठी लावण्यां’पासून ‘स्वरशांता’पर्यंत आणि शाहिरी पोवाड्यांचा कलाविष्कार!

अभिजात मराठी भाषा सप्ताहात मराठी लोककला, आणि संगीताची सुरेल मैफल
पिंपरी : मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य, लोककला, संगीत आणि रंगभूमीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना मिळत आहे. मराठी लावणी, बालनाट्य, शांता शेळके यांच्या गीतांचा सुरेल आविष्कार आणि शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविध कलारूपांचा अनुभव नागरिकांना मिळाला.

viara vcc
viara vcc

महिलांसाठी खास ‘मराठी लावण्यां’चा ठसकेबाज आविष्कार
सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात महिलांसाठी खास ‘मराठी लावण्यांचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिला कलाकारांनी महिला रसिकांसमोर सादर केलेल्या या कार्यक्रमात लावणीतील ठसका, नजाकत, अभिनय, नृत्य आणि ताल यांचा मनोहारी आविष्कार अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे कलाकारांच्या सादरीकरणाला दाद देतानाच महिला रसिकांनीही लावणीच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

indra dairy
indra dairy

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या माया खुटेगांवकर यांनी ‘विचार काय हाय तुमचा ओ पाव्हणं’ या लावणीद्वारे दमदार अदाकारी सादर केली. दोन बालगंधर्व पुरस्कार तसेच विठाबाई भाऊमांग पुरस्काराने सन्मानित अर्चना जावळेकर यांनी ‘या रावजी बसा भावजी’ या लोकप्रिय लावणीच्या माध्यमातून अभिनय, नृत्य आणि अदाकारीचा सुरेख मिलाफ घडविला. नमिता पाटील यांनी ‘आजकाल पाटलांचा लय रुबाब बाई लय रुबाब’, प्राची मुंबईकर यांनी ‘कुण्या गावचं आलं पाखरू’, तर पूजा विडकर आणि अस्मिता पुणेकर यांनी ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ या लावण्यांचे सादरीकरण केले.

शांता शेळकेंच्या शब्दांना सुरांची साथ; ‘स्वरशांता’ची भावस्पर्शी मैफल
नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे कवयित्री शांता शेळके यांच्या अजरामर गीतांवर आधारित ‘स्वरशांता’ हा संगीत कार्यक्रम संपन्न झाला. मंजुश्री दिवाण यांच्या संकल्पनेतून आणि सादरीकरणातून साकारलेल्या या कार्यक्रमातून शांता शेळके यांच्या शब्दप्रतिभेला सुरांचा साज चढविण्यात आला. ‘गणराज रंगी नाचतो’ या मंगलमय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘जय शारदे’, ‘ही वाट दूर जाते’, ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’, ‘घनराणी’, ‘हे श्याम सुंदर’, ‘पुनवेचा चंद्रमा आला घरी’, ‘वादळ वारं सुटलं’, ‘काटा रुते कुणाला’, ‘शालू हिरवा’, ‘माजे राणी माजे मोगा’, ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू’, ‘शारदा सुंदर चंदेरी राती’ आणि ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ अशा विविध गीतांच्या सादरीकरणातून शांता शेळके यांच्या गीतलेखनाचा विविधांगी आविष्कार रसिकांसमोर आला.

बालगीतांपासून चित्रपटगीतांपर्यंत, भावगीतांपासून कोळीगीतांपर्यंत आणि नाट्यगीतांपासून कोकणी गीतांपर्यंत शांता शेळके यांनी आपल्या लेखणीतून निर्माण केलेल्या शब्दवैभवाचा अनुभव या कार्यक्रमातून मिळाला. मंजुश्री दिवाण यांच्या शिष्यांनी स्पष्ट शब्दोच्चार, भावपूर्ण गायन आणि गीताच्या भावविश्वाशी एकरूप होणाऱ्या सादरीकरणातून प्रत्येक गीताला स्वतंत्र रंग दिला.

जागर मराठीचा… गजर शाहिरीचा’
महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या सहकार्याने ‘शाहिरी पोवाडा, जागर मराठीचा… गजर शाहिरीचा’ हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या मातीतील संत, शूरवीर आणि महापुरुषांच्या पराक्रमाचा इतिहास शाहिरी पोवाड्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर जिवंत करण्यात आला. एकूण १५ पारंपरिक आणि स्फूर्तीदायक रचनांचा सलग प्रवाह यावेळी सादर करण्यात आला.

पारंपरिक गण आणि शिवरायांच्या चरणी अर्पण केलेल्या मुजऱ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, शिवजन्म आणि स्वराज्यनिर्मितीचा संघर्ष उलगडणारे शिवजन्मपूर्व आणि शिवजन्म पोवाडे सादर करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"