Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
सांस्कृतिक

महापालिकेच्या वतीने साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस!

महापालिकेच्या वतीने साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस!

मराठी सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल
पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६: अभिजात मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठीचे संवर्धन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तसेच ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यामध्ये साहित्यिक चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन, अभिवाचन यातून मराठीचे अंतरंग उलगडले जाणार आहेत. तर नाटक, सांगितिक कार्यक्रम, एकांकिका, लोककला, लावणी, गझल असा वैविध्यपुर्ण कार्यक्रमांतून अभिजात मराठीचा जागर केला जाणार आहे. या महाउत्सवाचे उद्घाटन ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान देखील केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन मराठी भाषा संवर्धनाची लोकचळवळ अधिक गतीमान करावी असे आवाहन देखील डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, सांगवी येथील निळु फूले नाट्यगृह, चिखली येथील चिखली टाऊनहॉल आणि आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असणार आहेत.

indra dairy
indra dairy

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सनई, हलगी, संबळ आदी पारंपरिक वाद्यांच्या निनादात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता वैशाली पळसुले आणि सहकाऱ्यांचा ‘गणेश वंदना, कथक व लावणीची जुगलबंदी’ हा कार्यक्रम, सकाळी अकरा वाजता मोरया थिएटर्सचा ‘अंतर्नाद – अ जर्नी टू दी सोल’ हा नाट्य-संगीतमय आविष्कार सादर होणार आहे. सायंकाळी तीन वाजता सुप्रसिद्ध संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार असून, सायंकाळी चार वाजता ‘गाणी मंगेशकरांची’ हा त्यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता अशोक हांडे प्रस्तुत ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या संगीतमय रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता अथर्व थिएटर, चिंचवड यांची ‘भिरभिर’ ही एकांकिका, सकाळी दहा वाजता अस्मिता युवा मंच, पुणे यांची ‘इन दि नेम ऑफ’ ही एकांकिका सादर होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता संकर्षण कऱ्हाडे अभिनीत ‘नियम व अटी लागू’ हे नाटक, सायंकाळी पाच वाजता धनंजय म्हसकर, अमोल बावडेकर, योगिता गोडबोले, प्रिती निमकर आणि अनघा पेंडसे यांच्या सहभागातून ‘धरित्रीच्या लेकी’ हा कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता ‘द फोक महाराष्ट्र – ओळख माझ्या महाराष्ट्राची’ या महाराष्ट्राच्या लोककलेच्या भव्य सोहळ्याचे सादरीकरण होणार आहे.

सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता राविरा एंटरटेनमेंटची ‘नंतर कधीतरी’ ही एकांकिका सुबोध जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणार आहे. दुपारी बारा वाजता संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सागर कारंडे, शलाका पवार आणि सायली देशमुख भूमिका साकारणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता सचिन खेडेकर अभिनीत आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ हे नाटक, तर रात्री साडेनऊ वाजता लोकजागर ऍक्टिव्हिटीजचा सणांवर आधारित संगीत-नृत्यमय कार्यक्रम ‘सणयात्रा’ सादर होणार आहे.

मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मॉडर्न थिएटर, निगडीची ‘सोळाशे पन्नास’ ही एकांकिका, सकाळी दहा वाजता नाट्यसत्ताक संस्था, पुणे यांची ‘कॉर्पोरेट कबुतर’ ही एकांकिका सादर होणार आहे. दुपारी बारा वाजता मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री यांच्या सहभागातून देवेंद्र पेम यांचे ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक, सायंकाळी साडेपाच वाजता विराजस कुलकर्णी दिग्दर्शित ‘वरवरचे वधूवर’ हे नाटक सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सूरज परसनीस यांच्या अभिनयातून सादर होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता मानसी-अंजन प्रस्तुत ‘सूर वेली’ हा सांगीतिक प्रवास रंगणार आहे.

बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता ६५ कलाकार आणि २५ नृत्यांगनांच्या संचासह ‘फोक लावणी’ हा विशेष कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी प्रवेश केवळ महिलांसाठी असेल. सायंकाळी साडेपाच वाजता भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ हे विनोदी नाटक, तर रात्री साडेनऊ वाजता स्वराली एंटरप्रायजेस प्रस्तुत दिग्गज गायकांचा ‘स्वर मराठी मनाचा’ हा स्वरमयी प्रवास सादर होणार आहे.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विजय पटवर्धन लिखित ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे बालनाट्य होणार आहे. दुपारी बारा वाजता डॉ. आशिष मुजूमदार, अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांचा ‘गजल आख्यान’ हा कार्यक्रम, दुपारी साडेतीन वाजता रिदम रूट्स प्रस्तुत दख्खनच्या लोककलांचा ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता कवी वैभव जोशी यांच्या स्वरचित कविता-गझलांचा ‘द मनमौजी’ हा कार्यक्रम, तर रात्री साडेनऊ वाजता मैत्र प्रस्तुत मराठी संगीताचे विविध पैलू उलगडणारा ‘म…मराठीचा’ हा सांगीतिक सोहळा रंगणार आहे.

शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्लोबल थिएटर, आकुर्डी यांची ‘मुक्ताक्षरे’ ही एकांकिका, दुपारी बारा वाजता डॉ. गणेश शिंदे आणि सन्मिता धापटे-शिंदे यांचा वैचारिक व भक्तीमय ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता बक्षीस वितरण व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप समारंभ होणार असून, सायंकाळी साडेपाच वाजता नारायण सुमंत, प्रभाकर साळेगांवकर, प्रकाश घोडके, दिवाकर जोशी, हनुमंत सोनवणे, संध्या फुलपगार आणि सुप्रिया हळवे यांच्या सहभागातून निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रात्री नऊ वाजता ‘अविनाश – विश्वजित संगीत रजनी’ या सुपरहिट चित्रपट संगीतकारांच्या सांगीतिक कार्यक्रमाने या रंगमंचावरील कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"